अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी? विद्यार्थी-पालकांना काळजी!

अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी? विद्यार्थी-पालकांना काळजी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महानगरांमध्ये राबविण्यात येणार्‍या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. दहावीच्या निकालापूर्वी साधारण पंधरा दिवस आधीच दरवर्षी अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा दहावीचा निकाल मेअखेरपूर्वीच जाहीर करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिल्यानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झालेली नाही. निवडणुकांच्या धामधुमीत शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश प्रक्रियेचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल मेअखेरपर्यंत जाहीर होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. शालेय शिक्षण विभागाकडून पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक अशा महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने, तर इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेची योग्य माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया आणि त्यातील भाग एक भरण्याची प्रक्रिया काही दिवस अगोदरच सुरू करण्यात येते.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, गुणांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू होते. अशाच पद्धतीने गेल्या तीन वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. परंतु, यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी शिक्षण विभागाकडून अद्यापतरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागातील बहुतांश कर्मचार्‍यांकडे कदाचित निवडणुकीचे काम असल्यामुळे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू केली नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थी-पालकांना काळजी

दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे सोळा लाख विद्यार्थी बसतात. यापैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत असतात. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थीही उत्सुक असतात. आपल्या मुलांना अकरावीसाठी चांगले महाविद्यालय प्रवेशासाठी मिळावे, याची पालकांनाही काळजी असते. यंदा, प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत भाग एक म्हणजे काय?

  • अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागते.
  • या नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्याला नाव, जन्मतारीख, पत्ता, ई-मेल आयडी, प्रवर्ग, मोबाईल क्रमांक अशी सामान्य माहिती भरावी लागते.
  • ही माहिती भरल्यानंतर त्याची पडताळणी होते.
  • दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येतो. त्यामध्ये दहावीचे गुण आणि महाविद्यालयांचे पर्याय भरता येतात.
  • अशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन, असा अकरावी प्रवेशाचा पूर्ण अर्ज भरता येतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news