कोल्हापूर : शंभरी पार शाळांचे होणार जतन | पुढारी

कोल्हापूर : शंभरी पार शाळांचे होणार जतन

कोल्हापूर ; विकास कांबळे : जिल्ह्यात शंभर वर्षे पूर्ण झालेल्या शाळांच्या इमारती जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या शाळांच्या इमारती पाडण्याऐवजी (निर्लेखन) त्या इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निधी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

या शाळा बांधण्यात आल्या तेव्हा त्या थोड्या गावाबाहेर होत्या. परंतु; गावांचा विस्तार वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती आता गावाच्या मध्यभागी आल्या आहेत. यातील काही शाळा शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यातील काही शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. मात्र, अजूनही काही शाळांच्या इमारती चांगल्या आहेत.

परंतु; या शाळा पाडून त्याठिकाणी नवीन इमारतींचे प्रस्ताव ठेकेदार आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांमार्फत सादर करू लागले आहेत. त्यामुळे शाळा इमारतींच्या निर्लेखनाच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

इमारतींचा आकार मोठा असल्यामुळे या इमारती पाडल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात. काही ठिकाणी जुन्या इमारती पाडून त्यातून मिळणार्‍या रकमेएवढे नवीन इमारतींचे इस्टिमेट येऊ लागले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या शाळांच्या इमारतींचे जतन करण्यासंदर्भात विचार करत आहे. या शाळांचे निर्लेखन कसे टाळता येईल, यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Back to top button