कोल्हापूर : व्हेल माशाची उलटी; मोठ्या रॅकेटची शक्यता | पुढारी

कोल्हापूर : व्हेल माशाची उलटी; मोठ्या रॅकेटची शक्यता

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सव्वातीन कोटी रुपये किमतीच्या व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी अटक केलेल्या सहा जणांना चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने सर्व पातळीवर तपास केला जाणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

कोल्हापुरातील रमणमळा परिसरात गुरुवारी सापळा रचून व्हेल माशाची उलटी वन व पोलिस विभागाने जप्त केली होती. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील विश्वनाथ वामन नामदास (वय 30, रा. गोरेवाडी, ता. खानापूर), आलताफ आलमशाह मुल्ला (38, रा. ढवळी, ता. तासगाव), उदय विठोबा जाधव (50, रा. बेनापूर, ता. खानापूर), रफिक शौकत सनदी (34, रा. टाकळी रोड, चाँद मस्जीदजवळ, मिरज), किस्मत मुबारक नदाफ (40, रा. इस्लामपूर, ता. वाळवा) व आस्लम शिराज मुजावर (38, रा. बेनापूर) यांना गुरुवारी सांयकाळी अटक केली.

या सहा जणांविरोधात करवीरचे वनरक्षक आर. एस. मुल्लाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर उभे करण्यात आले. त्यांना सोमवार (दि. 17) पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विक्री करणारी टोळी असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाला मिळाली होती. यानंतर या टोळीला ‘उलटी’ खरेदीचे आमिष दाखवून कोल्हापुरात येणे भाग पाडले. सापळा रचून ‘उलटी’ची विक्री करताना सहा जणांना रंगेहाथ पकडले. ही उलटी या सहा जणांकडे आली कशी, त्यांनी ती कुठून आणली? ही उलटी एकच आहे की आणखी आहेत? यामागे आणखी कोण आहे, यात कोणी मोठा सूत्रधार आहे का, स्थानिक कोणाचा सहभाग आहे का?

उलटी ज्या ठिकाणांहून आणली, त्या ठिकाणी तस्करी सुरू असते का, यापूर्वी वन्यजीव संदर्भात अन्य काही गुन्हे या टोळीने केेले आहेत का? या सर्व तस्करीचे धागेदोरे अन्य कोणत्या राज्यात पसरले आहेत का, आदी विविध अंगाने तपास केला जाणार असल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले. काही ठिकाणी चौकशीसाठी पथकेही पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, अटक केलेल्यापैकी काही जण सराईत असून, त्यांच्यावर कोणत्या पोलिस ठाण्यात कोणते गुन्हे दाखल आहेत, याचीही माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button