रत्नागिरी: आंबव येथे विहिरीत आढळला मृत बिबट्या | पुढारी

रत्नागिरी: आंबव येथे विहिरीत आढळला मृत बिबट्या

साडवली : पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील आंबव (कोंड कदमराव) येथील गणपत दौलत जोशी यांच्या आंबा-काजूच्या बागेमध्ये असणाऱ्या विहिरीत मृत बिबट्या आढळून आला. ही घटना बुधवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आली . या मृत बिबट्याला वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने विहिरीबाहेर काढले. बिबट्या भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबव येथे विहिरीत बिबट्या पडल्याची खबर गावचे पोलीस पाटील प्रकाश पांचाळ यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता विहिरीतील बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ही विहिर सुमारे २५ फूट खोल आहे.

लाकडी शिडी विहिरीत सोडून कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोरीचा फास टाकून बिबट्याला विहिरीबाहेर काढले. देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी आनंदराव कदम यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. बिबट्या मादी प्रजातीचा असून त्याचे वय अंदाजे २ ते ३ वर्षे आहे.

पुढील तपास रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, देवरूखचे (संगमेश्वर) वनपाल तौफीक मुल्ला करीत आहेत. यावेळी विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, वनरक्षक आकाश कडुकर, अरूण माळी, पोलीस पाटील प्रकाश पांचाळ, शशिकांत माने, प्रशांत जोशी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button