मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील दोन जागांच्या बदल्यात भाजपकडे ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार असून धनुष्यबाण चिन्हाचा अधिक लाभ होणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. (Lok Sabha Election 2024)
महायुतीतील जागावाटपाचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत अंतिम फॉर्म्युला जाहीर होईल, असा दावा महायुतीतील तिन्ही पक्षांकडून केला जात आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी काही जागा प्रतिष्ठेच्या केल्याने जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला रखडला आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या सर्व जागांसोबतच शिवसेनेच्या पारंपारिक जागांसाठी शिंदे आग्रही असल्याचे समजते. त्यासाठी विद्यमान जागा सोडण्याचीही शिंदे गटाची तयारी आहे. यात दक्षिण मुंबई लोकसभा आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्या बदल्यात ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांची शिंदे गटाने मागणी केल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे ठाकरे गटासोबत आहेत. तसेच, त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले मिलिंद देवरा यांची शिंदे गटातील प्रवेशानंतर राज्यसभेत वर्णी लागली आहे. शिवाय, महायुतीत मनसेला घेऊन तिथे मनसे नेत्याला मैदानात उतरवायचे शक्यता लक्षात घेत ही जागा सोडण्याची तयारी शिंदे गटाने दाखविली आहे. तर, उत्तर पश्चिमचे खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असले तरी या जागेवरून त्यांचे पुत्र अमोल यांना ठाकरे गटाने रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे गजानन किर्तीकरांनी मुलाविरोधात निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटाने ही जागाही भाजपला सोडण्याची तयारी दाखविली आहे. मात्र त्या बदल्यात भाजपने ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर दावा करू नये अशी शिंदे गटाची मागणी आहे. या दोन्ही जागांवर सध्या ठाकरे गटाचे खासदार आहेत. मात्र या दोन्ही मतदारसंघात धनुष्यबाण फायद्याचे असल्याचे शिंदे गटाने भाजपच्या नजरेस आणू दिले आहे. (Lok Sabha Election 2024)