रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच उपलब्ध होणार एमआरआयची सुविधा | पुढारी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच उपलब्ध होणार एमआरआयची सुविधा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच एमआरआयची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना होणारा अतिरिक्त खर्च आवाक्यात येईल. महिन्याभरात ही सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.

शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉ. भास्कर जगताप यांनी नुकताच स्वीकारला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या जागी नुकतीच डॉ. भास्कर जगताप यांची जिल्हा शल्य चिकित्सक पदावर वर्णी लागली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा घेतला. यात त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची मंजूर पदे, सद्यस्थितीतील भरलेली पदे, हजर पदे आणि रिक्त पदे याबाबत चर्चा केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारीवर्गही कमी आहे. 70 परिचारिकांची पदेही रिक्त आहेत. आता ज्या परिचारिका काम करतात त्यांचे खरेतर आभार मानले पाहीजेत, कारण परिचारिका नसतील तर रुग्णांना सेवा कशी देणार. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या परिचारीकांचे खूप मोठे सहकार्य लाभत आहे. पुढील महिन्यापर्यंत परिचारीकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. त्यामुळे. रुग्णांना सेवा देणे सोपे होईल, जिल्हा रुग्णालयात एमआरआयची सुविधाही उपलब्ध होणार आहे. 27 फेब्रुवारीला एक समिती येऊन निरिक्षण करणार आहे. त्यानंतर एमआरआयचौ सेवाही सुरु होईल. एमआरआय आणि सीटीस्कॅनची यंत्रणा हाताळण्याची जबाबदारी दुसऱ्या एजन्सीला देण्यात येईल असेही डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.

Back to top button