कणकवली : कार दुभाजकावर आदळून मुंबई येथील चालक ठार | पुढारी

कणकवली : कार दुभाजकावर आदळून मुंबई येथील चालक ठार

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ उड्डाणपुलावर कार दुभाजकाला आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक प्रवीण सुंदर शेट्टी (वय 40, रा. घाटकोपर इस्ट) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी काव्यश्री प्रवीण शेट्टी (35), मुलगी आर्वी प्रवीण शेट्टी (9) व सिद्धेश भाऊसाहेब सटाले (30, सर्व रा. घाटकोपर इस्ट) यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास झाला.

वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस व कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण शेट्टी कार घेऊन पत्नी काव्यश्री, मुलगी आर्वी व सिद्धेश सटाले सोबत गोवा येथे पर्यटनासाठी निघाले होते. गुरुवारी सकाळी कार हुंबरठ येथे आली असता प्रवीण शेट्टी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचालकाच्या बाजूने दुभाजकाला आदळली. ही धडक एवढी भीषण होती की दुभाजकाला आदळल्यानंतर कार मुंबईच्या दिशेने उभी राहिली. कारचे इंजिन चालकाच्या बाजूने सीटपर्यंत चेपले गेले. तसेच कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला होता. त्याच दरम्यान त्या मार्गाने जाणारे महामार्ग पोलिस आशिष जाधव व अन्य प्रवाशांनी जखमींना कारमधून बाहेर काढले आणि घटनेची माहिती कणकवली पोलिसांना व वाहतूक पोलिसांना दिली.

तत्पूर्वी जखमींना खासगी वाहनाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, कॉ. किरण मेथे, भूषण सुतार, वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, महामार्ग पोलिस सावकार वावरे, दत्ता कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत प्रवीण शेट्टी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

अपघातात मृत प्रवीण शेट्टी यांची पत्नी काव्यश्री यांच्या उजव्या हाताचा मनगट फॅक्चर झाला असून उजव्या पायालाही दुखापत झाली आहे. तसेच मुलगी आर्वी हिच्या उजवा पाय फॅक्चर झाला तर सिद्धेश सटाले यांच्या डाव्या खांद्याला व पायाला तसेच उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. अपघातात कारमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने त्या ऑइलमध्ये घसरून दुसरा अपघात होऊ नये यादृष्टीने त्या ऑइलवर माती टाकण्यात आली होती. त्यामुळे काही वेळ त्या बाजूने येणार्‍या वाहनांसाठी तीन लेन मधील एकच लेन सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर अपघातग्रस्त कार जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

Back to top button