Biolumi Bioluminescent Fungi; सिंधुदुर्ग : होडावडे गावात सापडली रात्री चमकणारी बुरशी | पुढारी

Biolumi Bioluminescent Fungi; सिंधुदुर्ग : होडावडे गावात सापडली रात्री चमकणारी बुरशी

काशिराम गायकवाड

कुडाळ (सिंधुदुर्ग); पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेतुन दुर्मिळ बायोलुमिनिकन्स फंगी म्हणजेच रात्री चमकणाऱ्या बुरशीची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. (Biolumi Bioluminescent Fungi)

मंगेश माणगावकर यांना सोमवारी (दि. २४) रात्री अंधारात काही तरी चमकल्या सारखे दिसले जवळ जाऊन बॅटरीचा प्रकाशात परत पाहिले असता ती बुरशी आहे असे जाणवले. परत लाईट बंद करता ही बुरशी परत चमकायला लागली. यानंतर त्यांचा लक्षात आले की ही चमकणारी बुरशी आहे. त्यांनी तात्काळ त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांच्याशी संपर्क साधला. (Biolumi Bioluminescent Fungi)

डॉ. योगेश कोळी व त्यांचे संशोधक विद्यार्थी गुरुनाथ कदम, फैयाज तालिकोट आणि सर्पमित्र अनिल गावडे यांनी माणगावकर यांच्या परसबागेला भेट देऊन चमकणाऱ्या बुरशीबद्दल जाणून घेतले. बुरशी संवर्धनासंदर्भात माणगावकर यांना माहिती दिली.

डॉ. योगेश कोळी यांच्याकडून बुरशीबद्दल अधिक जाणून घेताना त्यांनी सांगितले की, ही एक दुर्मिळ चमकणारी बुरशी मायसेना या जातीची असून भारतामध्ये फक्त केरळ राज्यातून २०२१ साली याची प्रथम नोंद करण्यात आली होती. जगामध्ये चमकणाऱ्या बुरशीची नोंद मलेशिया, जपान, श्रीलंका, बुर्नो, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशातून करण्यात आली आहे.

याआधी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातून या प्रकाशमान बुरशीची नोंद करण्यात आली होती. त्यात आता होडावडे या गावाची अधिक भर पडली आहे. गावभागात अशाप्रकारची जैवविविधता पहिल्यांदाच मिळाल्यामुळे अनेक संशोधकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जगभरात अंधारात चमकणाऱ्या बुरशीच्या साधारण ७५ प्रजाती सापडतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच प्रकाशमान झालेल्या आढळून येतात. त्यांचा अधिवास हा प्रामुख्याने झाडाची साल आणि मृत झाडांच्या खोडावर असतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील पश्चिम घाटातील जंगलांमध्ये त्याच्या नोंदी आहेत. (Biolumi Bioluminescent Fungi)

चकाकणारी बुरशी साधारण ५२० ते ५३० एनएम तरंगलांबीचा हिरव्या रंगाचा प्रकाश निर्माण करते. हे प्रकाश उस्तर्जन सतत चालू असते आणि केवळ सजीव पेशींमधूनच प्रकाशाचे उस्तर्जन होते. प्रकाश उस्तर्जित करणारे वनपस्तीचे अवयव प्रजातीनुरूप वेगवेगळे असतात. या बुरशीची वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा महत्वाचा असतो.

८ वर्षांपूर्वी मंगेश माणगावकर यांच्याकडे अश्याच प्रकारे पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्मिळ मलबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणजेच उडणाऱ्या बेडकाची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक बेडकांचा सांभाळ करून त्यांचा अधिवास जपण्याचे काम श्री मांगावकर करत आहेत. त्यातच आणखीन एक दुर्मिळ अश्या चमकणाऱ्या बुरशीची नोंद त्यांच्या बागेतून झाल्याने मांगावकर यांनी त्यांच्याकडून होत असणाऱ्या कामाचे समाधान व्यक्त केले.

आतापर्यंत माणगावकर यांनी परसबागेतून वेगवेगळ्या ५ बुरशींची व इंडियन बुल फ्रॉग, कॉमन ट्री फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, नॅरो माऊथ फ्रॉग, फंगाईड फ्रॉग, बलून फ्रॉग, मलबार ग्लायडिंग फ्रॉग आणि कॉमन टोड या बेडकांची नोंद आजपर्यंत केली आहे. मांगावकर हे उडणाऱ्या बेडकांचे संवर्धन करणारे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओळखले जातात.

हेही वाचा;

Back to top button