IND vs WI ODI : वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचे नशीब उघडे

IND vs WI ODI : वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचे नशीब उघडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली, मात्र टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली. उभय देशांदरम्यान आता एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 27 जुलैपासून सुरू होणार आहे. दरम्यान, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली असून आता वेस्ट इंडिजने त्यांचा संघ जाहीर केला आहे.

'या' खेळाडूंचे पुनरागमन (IND vs WI ODI)

क्रिकेट वेस्ट इंडिजने वनडे, टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूंचे एक शिबिर आयोजित केले होते. केन्सिंग्टन ओव्हल येथे पार पडलेल्या या शिबिरातून 15 खेळाडूंची वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली. शाई होप वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व करणार असून रोव्हमन पॉवेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी सर्वोत्तम फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांना संधी दिली आहे. तर वेगवान गोलंदाज जेडेन सील्स, लेगस्पिनर यानिक कारिया आणि फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती यांनी दुखापतीतून बरे होत संघात पुनरागमन केले आहे. हे तिन्ही खेळाडू आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

हेटमायरची विश्वचषक पात्रता फेरीसाठी निवड झाली नव्हती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पात्रता फेरीतील सातपैकी चार सामने गमावल्यानंतर विंडिजचा संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. हेटमायरने वनडे क्रिकेटमध्ये 2 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. त्याने शेवटचा टी-20 सामना ऑगस्ट 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळला होता. तर 26 जुलै 2021 रोजी ब्रिजटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामना खेळताना तो दिसला होता. निकोलस पूरन आणि जेसन होल्डर हे अनुपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. कीमो पॉल दुखापतीमुळे त्याचे स्थान पक्के करू शकलेला नाही.

'हेटमायरच्या पुनरागमनाने विंडिजची मधली फळी मजबूत'

विंडिज क्रिकेटचे मुख्य निवडकर्ता डॉ. डेसमंड हेन्स म्हणाले की, ओशाने थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांच्या पुनरागमनामुळे आनंद झाला आहे. त्यांचे स्वागत आहे. दोघेही यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. यावेळी दोन्ही खेळाडू संघाच्या सेटअपमध्ये फिट होतील. शिमरॉन फिनिशरची भूमिका बजावू शकतो, त्याच्या येण्याने मधली फळी मजबूत होईल.'

वेस्ट इंडिजचा वनडे संघ :

शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अॅलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसे कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉम्स.

भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल,कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहमद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

मालिकेचे वेळापत्रक, सामन्यांची वेळ

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WI vs IND) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गुरुवार, 27 जुलै आणि शनिवार, 29 जुलै रोजी केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळले जातील. त्यानंतर मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे खेळवला जाणार आहे. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता ( विंडिजमधील वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता) सुरू होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news