कोकणात मोसमी पावसाच्या मार्गात अडचणी | पुढारी

कोकणात मोसमी पावसाच्या मार्गात अडचणी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अरबी सागरात बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वार्‍याचा जोर कमी झाला आहे. बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाने खेचल्यामुळे तळकोकणात दाखल झालेल्या मोसमी वार्‍याची प्रगती खुंटली असल्याने मोसमी पाऊस सक्रिय होण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच पूर्वमोसमीसाठी पोषक वातावरण असताना त्याची सक्रियताही अडखळली आहे.

केरळकडून कूच केल्यानंतर किनारपट्टीपर्यंत कुठेही मोसमी पाऊस फारसा सुरू नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मोसमी वार्‍याचा जोर मंदावला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाकडे खेचले गेल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा अपेक्षित जोर दिसून येत नाही. त्याचाच परिणाम राज्यातील मोसमी वार्‍याच्या प्रगतीवर दिसून येत आहे. मोसमी वार्‍याच्या प्रगतीसाठी हळूहळू पोषक वातावरण तयार होत आहे. दि. 18 ते 21 जून या काळात दक्षिण भारत, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात पाऊस सक्रिय होईल. 23 जूननंतर महाराष्ट्र, मध्य भारतात पाऊस सक्रिय होईल. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचा अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.

Back to top button