शिक्षक भरती : टीएआयटी परीक्षेचा निकाल जाहीर; शासन निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष | पुढारी

शिक्षक भरती : टीएआयटी परीक्षेचा निकाल जाहीर; शासन निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिक्षक भरतीसाठी झालेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा (टीएआयटी) निकाल (शुक्रवार) दि 24 रोजी सायंकाळी जाहीर झाला. अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 30 हजार शिक्षकांची पदभरती व विभागीय स्तरावर भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. आता प्रत्यक्षात रिक्त पदे किती भरली जाणार व विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार? याकडे राज्यातील डीएड्, बीएड्धारकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, ती भरणार कधी? या मुद्द्यांवरून अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्री केसरकर यांना अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी सुमारे 30 हजार पदांची भरती करण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत आश्वासन दिले. त्यानुसार परीक्षा परिषदेकडून आयबीपीएस कंपनीकडून 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने टीएआयटीची परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 2 लाख 39 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील दुबार अर्ज नोंदणी वगळून 2 लाख 28 हजार 84 हजार उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आले. यापैकी 2 लाख 16 हजार 444 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. आता निकालही लागला असून, प्रत्यक्ष जागा किती भरणार, आणि विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

दरवेळी हजारो पदे भरण्याची घोषणा होते, प्रत्यक्षात मात्र घोषणेच्या निम्मी व त्यापेक्षा कमी पदे भरली जातात. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सन 2017 मध्ये 24 हजार पदांची घोषणा केली. त्यानंतर सुमारे 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया झाली. प्रत्यक्षात मात्र साडेचार ते पाच हजार पदांची भरती करण्यात आली. अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 5 वर्षे झाली तरी 2017 ची भरती अद्याप सुरूच आहे. त्यामुळे दरवेळी मिळणार्‍या हजारोंच्या आश्वासनांवर परीक्षा देणार्‍यांचा विश्वासच राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया परीक्षा देणार्‍यांतून उमटत आहेत. आता तरी ना. केसरकर आपल्या 30 हजारांच्या घोषणेवर ठाम राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय 2017 पासून घेण्यात आला आहे. टीईटी पात्र (शिक्षक पात्रता परीक्षा), बीएड् व इतरांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (टीएआयटी) 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत घेण्यात आली. परीक्षा ऑनलाईन असल्याने तत्काळ गुण समजणे आवश्यक होते. दोन-तीन दिवसांनी निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र 20 पेक्षा जास्त दिवस निकाल लांबवण्यात आल्याने परीक्षा देणार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अर्ज भरणे, परीक्षा घेणे यामध्ये फारच थोड्या दिवसांचा कालावधी देण्यात आला. प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर अभ्यास करायलासुद्धा फार दिवस देण्यात आले नाहीत, इतकी जलद गतीने प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर निकालाला मात्र 20 पेक्षा जास्त दिवस लावल्याने यात काही गौडबंगाल तर नाही ना? अशी चर्चा आता परीक्षा देणार्‍यांमध्ये सुरू झाली आहे. परीक्षेचा बॅचेसनिहाय निकाल नॉर्मलायझेशन करून तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रश्नांबाबत अभिप्रायही घेण्यात आला, असे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार आहे.

वेळ कमी, काठिण्यता जास्त

यंदाच्या भरती परीक्षेत रिझनिंगवर (तर्क व अनुमान) मोठ्या प्रमाणात भर देण्यात आल्याने ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे की बँकेच्या अधिकार्‍यांसाठी आहे? असा सवाल उमेदवारांतून करण्यात येत होता. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी तर परीक्षेनंतर संताप व्यक्त केला. 2 तासांमध्ये 200 प्रश्न विचारण्यात आले होते. निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी एकमेकांचे गुण तपासले असता 90 ते 120 पर्यंत गुण असणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागा किती उपलब्ध होणार त्यानुसार मेरिट ठरणार आहे. तरीही मेरिट किती लागणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 2017 साली सरासरी 130 पेक्षा जास्त गुण असणार्‍यांची निवड झाली होती. यंदा गुणांची सरासरी कमी झाली आहे.

विभागीय भरतीसाठी कोकणातून एल्गार

परजिल्ह्यातून कोकणात नोकरीसाठी यायचे आणि काही वर्षांनी बदली करून जायचे, असे प्रकार कोकणात सुरू असल्याने जिल्हा बदलीची समस्या वाढली आहे. येथील विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत रत्नागिरीत 1300 जागा रिक्त असून, 700 शिक्षक जिल्हा बदली करून जाणार आहेत. हीच स्थिती रायगड, सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यामुळे विभागीय भरती करून स्थानिकांना न्याय द्यावा, यासाठी कोकणातून आंदोलने सुरू झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा : 

Back to top button