कोकण पट्ट्यात वातावरणातील बदलांचा आंबा पिकाला फटका | पुढारी

कोकण पट्ट्यात वातावरणातील बदलांचा आंबा पिकाला फटका

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : कोकण पटयातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड जिल्हयात आंबा शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढत्या उष्म्यामुळे फळगळती तर अवकाळीमुळे मोहोरावर थ्रिप्स कीटकांचे बस्तान यामुळे खार रोगाचे थैमान यामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. एकंदरीतच गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादनात ६० टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे यंदाही मोठया नुकसानीच्या भितीने आंबा शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, मुरबाड परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी, अलिबाग, वसईचा पांढरा कांदा, घोलवडचा चिकू, पालघर बहाडोलीचे जांभूळ पिक तसेच भाजीपाला व्यवसाय संकटात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही काळ उन्हाची काहिली तर दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, बरसणारा अवकाळी पाऊस यांमुळे फळपिके धोक्यात आले आहे. यंदा आंबा पिकाला फोठा फटका बसला आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे मोहराने बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धारण केलेली बागायती धोक्यात आली आहे. आंबा बागेत कैऱ्या गळून खच पडला आहे. मोहोराला या पावसामुळे आता बुरशी धरू लागली आहे. खार रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहोर पूर्णता काळवंडला आहे. त्यामुळे आंबा बागातदार शेतकरी चिंतेत पडले आहेत. यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. मात्र ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लालकोळी, भुरी रोग, मोहोर काळा पडणे, यातून चिकटी व मधुरा पडण्याच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसची जात जगप्रसिद्ध आहे. उरण परिसरात या जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवेळी पाऊस, तापमानात वाढ आणि कमीपणा आदीबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक योजना लागू करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

या वर्षी आंबा पिक चांगले येईल अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवेळी पावसाचा चांगलाच बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. – प्रफुल्ल खारपाटील, आंबा शेतकरी.

Back to top button