पत्रकार वारीशे घातपात प्रकरण : अंथरुणाला खिळलेल्या आजीसोबत यशला काढायचंय आयुष्य! | पुढारी

पत्रकार वारीशे घातपात प्रकरण : अंथरुणाला खिळलेल्या आजीसोबत यशला काढायचंय आयुष्य!

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : शशिकांत वारीशे यांच्या हत्येनंतर वारीशे कुटुंबाचा आधारच हरपला आहे. घरातील कर्ता पुरुषच हरपल्याने कुटुंबाची वाताहत झाली आहे. शशिकांत यांचा मुलगा यश याला आता अंथरुणाला खिळलेल्या आजीसोबत पुढील आयुष्य जगायचंय… ही विदारक वस्तुस्थिती पाहून कुटुंबाला सावरायला जाणार्‍यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत आहेत.

19 वर्षांचा यश हा शशिकांत यांचा एकुलता एक मुलगा.. वडिलांच्या अचानक जाण्यानं अंतर्बाह्य मोडून पडलेला.. येणार्‍याकडं निर्विकार नजरेनं पाहणार्‍या यशची अवस्था पाहून सारेच नि:शब्द होत आहेत. प्रचंड घाबरलेला यश हताश होऊन टाहो फोडत आहे. वडील गेल्याने यश आता एकटा पडला आहे. वारीशे यांच्या घरात तीन माणसं… शशिकांत, त्याची 75 वर्षांची अंथरुणाला खिळलेली आई आणि मुलगा यश. या त्रिकोणी कुटुंबाचा शशिकांत हाच एकमेव आधार होता. तोही गमावला.

शशिकांत यांचे घर जेमतेम चार-पाच माणसं बसतील एवढेच आहे. पक्के घर नाही, मातीने सारवलेल्या भिंती, ओसरी मातीचीच… ती शेणानं सारवलेली, मातीच्या चुलीच्या आसपास पडलेली दोन-चार भांडी, किराणा सामानही नसल्याचे बोलले जात आहे. शशिकांत वारीशे यांची जमीन वगैरे सुद्धा नसल्याची माहिती गावातील लोकांनी दिली. पत्रकारितेतून मिळणार्‍या तुटपुंज्या मानधनावर त्यांचा कसाबसा संसार चालत होता, असे गावातील लोक सांगत आहेत. या घटनेनंतर आता अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारीही वारीशे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पुढे येत आहेत.

बाबांना मारलं आता मलाही मारतील…

यश चार वर्षांचा असताना त्याची आई सोडून गेली. आजी आणि शशिकांतने यशचे संगोपन केले. यश सध्या आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र, अगोदर आई सोडून गेली, आता बाबा गेले. आजी अंथरुणाला खिळलेली. यशचं आता पुढं काय होणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच यश सध्या प्रचंड भीतीच्या छायेखाली आहे. बाबांना मारलं… आता हे लोक मलाही मारतील अशी भीती तो व्यक्त करतोय.

Back to top button