रत्नागिरी : ‘इस्रो’ भेटीत विद्यार्थांनी पाहिले अंतराळ जग | पुढारी

रत्नागिरी : ‘इस्रो’ भेटीत विद्यार्थांनी पाहिले अंतराळ जग

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी जि. प. च्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील 27 विद्यार्थी इस्रो भेटीला नेले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी अंतराळातील जग पाहिले आहे. सर्वच विद्यार्थी प्रथम विमानात बसल्याने त्यांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद पाहायला मिळाला. त्याचबरोबर इस्त्रोच्या भेटीने हे विद्यार्थी भारावले आहेत.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या जि. प. च्या शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळखी व्हाव, यासाठी अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्त्रो या संस्थांना गुणवंत विद्यार्थ्यांना भेट घडविण्यात येण्याचा उपक्रम जि.प. ने हाती घेतला आहे. याचा पहिला टप्पा पार पडला आहे.

पहिल्या टप्प्यात 27 विद्यार्थ्यांना त्रिवेंद्रम येथील इस्त्रो या अंतराळातील संशोधन संस्थेत नेण्यात आले. तिन दिवसांच्या या दौर्‍यात बंगळुरु येथील सर वीश्वेश्वरय्या म्युझिअमही विद्यार्थ्यांना पाहता आले. पालकमंत्री उदय सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, एस. जे. मुरकुटे आदींनी प्रत्यक्ष दौर्‍यात सहभाग घेतला होता. प्रत्यक्षात रॉकेट लाँच कसे केले जाते, किती वेगाने ते अंराळात जाते, विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर त्याचे भाग कसे वेगळे होतात हे प्रत्यक्ष पहायला मिळाले. हा प्रसंग अवर्णनिय असाच होता. तीन सेकंदात रॉकेटसाठी किलोमीटर अंतर कापते, अशी माहिती तिथे गेल्यानंतरच समजली, अशी प्रतिक्रिया ‘इस्त्रो’ भेटीनंतर या सर्व मुलांनी दिली.

या दौर्‍यात सहभागी झालेल्या कोन्हवली (ता. मंडणगड) जिल्हा परिषद शाळेतील सातवीची विद्यार्थीनी प्रभुती घाग्रुम हीच्याशी संवाद साधला असता, ती म्हणाली, पणजी विमानतळावरुन इस्त्रोचा दौरा सुरु झाला. , विमानात बसण्याचा पहिलाच प्रसंग होता. सोबत असलेल्या महिला अधिकार्‍यांमुळे हा प्रवास चांगलाच झाला. उड्डाण करतानाची स्थिती अनुभवायला मिळाली. खुपच आनंद वाटला. बंगळुरुला पोचल्यानंतर दुसर्‍या दिवशी सर विश्वेश्वरय्या म्युझिअम पाहीले. तिथे उपग्रहांच्या प्रतिकृती, हवेवर चालणारी इंजिन्स, हवेचा दाब कसा असतो याची प्रात्यक्षिकं, पहिल्या विमानाची प्रतिकृती पहायला मिळाली. पुस्तकात किंवा टीव्हीवर पहायला मिळणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात पाहता आला, असे तिने सांगितले.

Back to top button