कोकण विशेष : कोकणच्या पुरातन मंदिर वास्तुवैभवाला पर्यटकांची साथ | पुढारी

कोकण विशेष : कोकणच्या पुरातन मंदिर वास्तुवैभवाला पर्यटकांची साथ

रत्नागिरी वृत्तसेवा; शशी सावंत: कोकणातील पुरातन मंदिरे ही गेल्या दहा वर्षांमध्ये धार्मिक पर्यटनाची केंद्रे होऊ लागली आहेत. यामध्ये अंबरनाथ, ठाणे शिव मंदिर, टिटवाळ्याचे गणेश मंदिर, रायगडमधील अलिबागचे कनकेश्वर, चौलचे दत्त मंदिर, अलिबाग – नागाव येथील रामेश्वर मंदिर, कुलाबा किल्ल्यातील गणेश पंचायत, दापोली हेदवीचा दशभुजा गणेश, श्रीवर्धन हरिहरेश्वर येथील शिव मंदिर, गणपतीपुळे येथील विनायक, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर, विजयदुर्गचा श्रीदेव रामेश्वर, राजापूर- आडिवऱ्याची महाकाली, वेंगुर्ले तालुक्यातील वेतोबा ही यातील प्रमुख मंदिरे आहेत. प्रामुख्याने कोकणच्या इतिहासामध्ये बहमनी, अपरांत, शिलाहार, चालुक्य, कदंब अशा राजांची राज्ये प्रस्थापित होती. या काळात मंदिरे उभी राहिल्याचे पुरातन दाखले आहेत.

कोकणची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या धरणीकंपातून झाल्याचा उल्लेख सह्याद्री खंडात आहे. शास्त्रीय सिद्धांतानुसार त्याकाळात त्या भागात लोकवस्ती नव्हती. प्रचंड महाकाय डायनासोर यासारखी श्वापदे होती. भूकंपाच्या तडाख्यात निर्माण झालेली कोकण ही अपरांत भूमी आहे. या भागाच्या उशाला कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर अशी उंच ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणांवर आज प्राचीन मंदिरे आहेत. ७२० किमीची सागरी किनारपट्टी हीसुद्धा धार्मिक पर्यटनाचे केंद्र होत आहे. अभ्यासकांच्या मतानुसार, पुरातन मंदिरे ही ११ व्या व १२ व्या शतकांतील आहेत.

कोकणातील प्राचीन मंदिर वास्तू म्हणजे तेथे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीने निर्मिती केलेला कलाविष्कार आहे. या मंदिर कलाकृती भागाचे सौंदर्य आणखीन विशाल करत आहेत. यातील चिपळूणजवळील परशुराम मंदिर हेही पुरातन वास्तुशिल्पाचे मोठे उदाहरण आहे. ही परशुरामाची भूमी असाच नामोल्लेख आढळतो. परशुरामाच्या आईचे नाव कोकण्णा होते. त्यावरूनच कोकणभूमी असा नामोल्लेख झाला.

सातवाहन, यादव, शिलाहार या राजांचे साम्राज्य येथे होते. या साम्राज्याच्या पाऊलखुणा आजही मंदिर वास्तूतून प्रदर्शित होतात. अलिबागमधील आवास येथील नागेश्वर, कोटेश्वर, चौलचे गणेश मंदिर, पेणची अंबामाता, व्याघ्रेश्वर मंदिर, चौलचा रामेश्वर या मंदिरांना प्राचीन दगडी शिल्पकलेचा साज आहे. मंदिरांसमोरील जलाशये, दीपमाळी ही रचनादेखील पुरातन आहे. महड व पाली येथील अष्टविनायक गणेश मंदिरे हीसुद्धा शिल्पकलेचा आविष्कार आहेत.

पारंपरिक प्राचीन मंदिरांची रचना ही समान कलेच्या धाग्याने बांधली गेली आहे. सभामंडप प्रशस्त आहेत. दोन्ही मंदिरांतील अष्टविनायक गणेशमूर्ती दगडी आहेत. त्यांना प्राचीन मूर्तिकलेचा साज आहे. सुधागड- उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड, दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर हेसुद्धा प्राचीन धाग्याने जोडले गेले आहे. प्राचीन मूर्तीमध्ये दिवेआगरचा रूपनारायण म्हणजे केशवविष्णूंची मूर्ती आहे. काळ्या दगडातून साकारलेली ही चमकदार, झळईयुक्त मूर्ती आहे. ती अकराव्या शतकाशी नाते सांगते.. हेमाडपंती शिल्पकलेचा नमुना दाखवणारी मंदिरे चौल, अंबरनाथ, कनकेश्वर, कुणकेश्वर येथे आढळतात. या मंदिरांमधील उत्सवही परंपरेने चालत आलेले आहेत.

अलीकडच्या दहा वर्षांत या मंदिरांचे वास्तुवैभव पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या दहा वर्षांत ३ लाख पर्यटकांनी या भागाला भेट दिल्याचे आकडे समोर आले आहेत. राज्य सरकारने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये राजापूरचे धूतपापेश्वर, गणपतीपुळे, अष्टविनायक क्षेत्रे महड व पाली आणि अन्य जवळपास ६५ मंदिरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या मंदिरांचे जतन आणि संवर्धन झाले तर नक्कीच आपल्याला हे वास्तुवैभव सुलभतेने पाहता येईल.

Back to top button