सिंधुदुर्ग : करूळ घाटमार्गासाठी २४९ कोटींचा निधी मंजूर  | पुढारी

सिंधुदुर्ग : करूळ घाटमार्गासाठी २४९ कोटींचा निधी मंजूर 

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर या महामार्गाचा दर्जा दिलेल्या मार्गातील करूळ घाटमार्गाच्या सक्षमीकरणासाठी अखेर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 249 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा याबाबतचे आदेश प्राप्त झाले. वरील मार्गापैकी गगनबावडा कमानीपासून पुढे कोल्हापूर हद्दीतील 5 कि.मी. आणि सिंधुदुर्ग हद्दीतील गगनबावडा घाटमार्गासह 16 कि.मी. अशा सुमारे 21 कि.मी. मार्गाचे दुपदरीकरण, मजबुतीकरण होणार आहे.

यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ढासळणारा करूळ-गगनबावडा घाटमार्ग आता मजबूत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्ग प्राधिकरणचे खारेपाटण उपविभागाचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी याबाबतची माहिती दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर या राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला; पण प्रत्यक्ष त्यानुसार काम कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा होती. या मार्गातील सर्वात कळीचा मुद्दा होता तो करूळ-गगनबावडा घाटमार्ग. वळणावळणाचा हा घाटमार्ग पावसाळ्यात वारंवार कोसळणार्‍या दरडींमुळे आणि ढासळणार्‍या भिंतींमुळे जर्जर झाला होता. त्याशिवाय खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूकही धोकादायक झाली होती. दरवर्षी या मार्गासाठी आंदोलने केली जात होती. कोल्हापूरकडे जाण्या-येण्यासाठी गगनबावडा घाटमार्गाला वाहनचालकांची सर्वाधिक पसंती असते मात्र हा घाटमार्ग नादुरुस्त असल्याने वाहनचालकांना त्याचा मोठा फटका बसत होता.

या घाटमार्गाच्या सक्षमीकरणासाठी महामार्ग प्राधिकरणने दोन वर्षापूर्वी सुमारे 300 कोटीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाकडे पाठवला होता. खारेपाटण विभागाचे उपअभियंता अतुल शिवनिवार हे सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होते. नोव्हेंबर महिन्यात जिल्हा व्यापारी महासंघानेही या घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणसह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. आ. नितेश राणे यांनीही करुळ घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती.

अखेर 11 कि.मी.चा करुळ घाटमार्ग, तळेरेपासून वैभववाडीकडे 6 कि.मी.चा टप्पा सोडून पुढील 5 कि.मी.चा टप्पा आणि कोल्हापूर हद्दीतील गगनबावडा कमान सोडल्यानंतर पुढे 5 कि.मी अशा एकूण 21 कि.मी.च्या टप्प्यातील काँक्रीटीकरण व सक्षमीकरणासाठी सुमारे 249 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. करुळ घाटमार्ग सध्या 7 मी. रुंदीचा आहे. या घाटमार्गाचे संपूर्ण काँक्रीटीकरण, संरक्षक भिंती, संरक्षक कठडे, गटारे, 30 ते 40 मोर्‍या अशी कामे केली जाणार आहेत. या घाटमार्गात आवश्यक ठिकाणी भूसंपादनाचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.

एकीकडे महामार्ग प्राधिकरणने करुळ घाटमार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला असतानाच टेंडर प्रक्रियाही सुरु केली होती. आता निधी मंजूर झाल्याने महिन्याभरात कंत्राटदार कंपनी निश्चित करुन कामासही प्रारंभ केला जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात करुळ घाटमार्ग मजबूत आणि सक्षम होणार आहे. तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या टप्प्यातील कोल्हापूरपासून गगनबावडयापर्यंत आणि वैभववाडीपासून तळेरेपर्यंत उर्वरित मार्गाचे रुंदीकरण व सक्षमीकरणही टप्प्याटप्प्याने होणार आहे.

Back to top button