रत्नागिरीत ठाकरेंचे वर्चस्व | पुढारी

रत्नागिरीत ठाकरेंचे वर्चस्व

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गावचा गाडा नेमका कोण हाकणार, हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आपणच ‘पॉवरफुल’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

प्रतिष्ठेच्या व मोठ्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला कब्जा केला आहे. शिंदे गट व भाजपचा मात्र धोबीपछाड झाला आहे. मंत्री उदय सामंत यांना धक्का बसला आहे. त्यांच्याकडून महत्त्वाच्या ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे गेल्या आहेत.

जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये चिपळूण तालुक्यात संख्या जास्त आहे तर 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडली. सध्याचे राजकीय धुमशान बघता गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरले होते.

राज्यात बंड नाट्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या. जिल्ह्यात एकूण पाच आमदार आहेत. त्यापैकी खेडचे योगेश कदम, गुहागरचे भास्कर जाधव, रत्नागिरीचे उदय सामंत व राजापूरचे राजन साळवी हे चार सेनेचे आमदार आहेत. त्यापैकी सुरूवातीला योगेश कदम आणि त्यानंतर नाही नाही म्हणत उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. यामुळे एकंदरित 50 टक्के शिवसेना शिंदे गटात गेली, असे दावे करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागले होते.

जिल्ह्याचा विचार करता शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) चांगले म्हणजे ‘नंबर वन’चा पक्ष ठरला आहे. ग्रामीण भागात आजही उद्धव ठाकरेंची जादू कायम आहे, हे दिसून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिले होते ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडे. कारण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिरगाव, पोमेंडी, फणसोप या ग्रामपंचायतींकडे स्वत: लक्ष दिले होते. शिरगावमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये मात्र महाविकास आघाडीने बाजी मारत सरपंचपद राखले. तर पोमेंडी व फणसोपमध्ये शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये ठाकरे गटाने एकतर्फी सत्ता मिळवली. यामुळे उदय सामंत यांना चांगलाच धक्का मिळाला आहे. या निकालावरून ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांची सेनाच पॉवरफुल असल्याचे दिसून येत आहे.

लांजा व राजापूर तालुक्यात आ. राजन साळवी यांनी आपला गड राखला आहे. लांजा तालुक्यात 13 पैकी 5 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. तर एक ग्रामपंचायतीवर काँग्रेस तर एका ग्रामपंचायतीवर भाजपला यश मिळाले आहे. तर पाच ठिकाणी गाव पॅनेलला यश आले आहे. राजापूर तालुक्यात 10 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर सेनेने आपला दावा केला आहे. येथे सेनेचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

गुहागर तालुक्यातही भास्कर जाधव यांनी आपला गड राखला आहे. अंजनवेल या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर सेनेने (उद्धव ठाकरे गट) यश मिळवले आहे. एकूण 5 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. भाजप व शिंदे गट भुईसपाट झाला आहे. चिपळूण तालुक्यातही हीच स्थिती आहे. 15 पैकी 10 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने यश मिळवले आहे.

दापोली तालुक्यात दोनच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी एका ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने तर एका ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा वरचष्मा दिसला. मंडणगड तालुक्यात मात्र दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यश मिळाले आहे. आ. योगेश कदम यांना हा गड राखण्यात यश आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने तर दोन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने दावा केला आहे.

Back to top button