रत्नागिरी : भाजपाकडून लोकसभेसाठी रणनीती सुरू | पुढारी

रत्नागिरी : भाजपाकडून लोकसभेसाठी रणनीती सुरू

चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय रणनीती सुरू झाली असून, यापूर्वी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या संदर्भात माजी खा. राणे यांनी सोमवारी सायंकाळी उशिराने चिपळुणातील भाजप पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा व नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी त्वरित जनसंपर्क अभियान सुरू करा, अशी सूचना केली.

आगामी निवडणुका लढविण्यासाठी चिपळुणातील भाजपने राजकीय हालचाली सुरू केल्या असून, निवडणूक संदर्भात नियोजन करण्यासाठी रविवार दि.31 ऑगस्ट रोजी शहर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या पाठोपाठ सोमवारी माजी खासदार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी उशिराने बैठक घेण्यात आली. राणे यांच्यावर चिपळूण न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असून, लोकनियुक्‍त नगराध्यक्षांसह बहुतांश सदस्य भाजपच्या माध्यमातून निवडून आणणे व न.प.त भाजपची एकहाती सत्ता वर्चस्व तयार करणे यासाठी राणे यांनी या बैठकीत प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

भाजपाचा दि. 7 ऑगस्टला मेळावा
भाजपची ताकद आजमाविण्यासाठी दि. 7 ऑगस्ट रोजी शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचा मेळावा आयोजित करण्याबाबत नियोजन करण्याची सूचना देण्यात आली. तसेच प्रत्येक मतदार व नागरिकपर्यंत जाऊन केंद्रातील भाजप सरकारच्या योजनांची माहिती देऊन जनमानसात भाजपबद्दल सकारात्मक भूमिका निर्माण करण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, भाजपकडून पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील प्रत्येक प्रभागात पोहोचत असल्याची माहिती यावेळी राणे यांना देण्यात आली.

Back to top button