रत्नागिरी : नांदिवसे-राधानगरमध्ये डोंगराला तडे | पुढारी

रत्नागिरी : नांदिवसे-राधानगरमध्ये डोंगराला तडे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : तालुका परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी कोसळणे तसेच डोंगराला भेगा पडण्याच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वी परशुराम घाटात डोंगराला भेगा पडल्या होत्या. आता अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे-राधानगर, स्वयंदेव आदी भागात डोंगराला भेगा पडल्या असून या परिसरातील दहा कुटुंबातील 40 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली असून पावसाचा जोर कायमच आहे.

एनडीआरएफ व प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी तत्काळ भेट देत लोकांची शासकीय इमारत तसेच गावातील अन्य लोकांकडे व्यवस्था केली आहे. राधानगर येथील जि. प. शाळेत चार कुटुंबे, राधानगर अंगणवाडीमध्ये दोन, गावातील अन्य सुरक्षित घरांमध्ये चार, धनगरवाडीतील एक कुटुंब शाळेच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. स्वयंदेवमधील 19 कुटुंबे गावातील सुरक्षित घरांमध्ये स्थलांतरित केली गेली आहेत. येथील तलाठी नंद गवळी, ग्रामसेवक हांगे यांनी या ठिकाणी भेट देत ग्रा.पं.मार्फत ग्रामस्थांमध्ये जागृती आणि एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

चिपळूण परिसरात दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, दुपारनंतर पाऊस सुरू झाला आहे. तालुक्यातील नांदिवसे राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी या भागात गेल्यावर्षी डोंगराला तडे गेेले होते. अतिवृष्टीमुळे दरडही कोसळली होती. यावर्षीही राधानगरमधील भागात डोंगराला भेगा गेल्या आहेत. यामुळे स्थानिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

दरम्यान, तालुका परिसरात पावसाने गतवर्षीची

सरासरी गाठली असून चिपळुणात मागील चोवीस तासात 79.50 मि.मी. पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत पावसाने 1200 मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे. या शिवाय शहरातून वाहणारी वाशिष्ठी व शिव नदी इशारा पातळीच्या खालून वाहत आहे. यामुळे अजूनपर्यंत तरी शहरवासीयांना पावसामुळे कोणताही धोका पोहोचलेला नाही.

Back to top button