रत्नागिरी: जिल्ह्यात धो धो पाऊस; रेड अलर्ट जारी | पुढारी

रत्नागिरी: जिल्ह्यात धो धो पाऊस; रेड अलर्ट जारी

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा सोमवारी जोरदार मुसंडी मारलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारीही दिवसभर मुसळधार सातत्य कायम ठेवले होते. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील जलस्तर वाढू लागला असून, चार नद्यांनी इशारा पातळीही ओलांडली आहे. नद्यांच्या परिसरातील गावामध्ये प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. दि. 9 जुलैपर्यंत कोकण किनारपट्टीत अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला असून ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

अतिवृष्टीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने दरडग्रस्त भागातील 27 कुटुंबांतील 102 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्‍त झाली आहे. जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार कोसळणार्‍या पावसाचा जोर मंगळवारीही दिवसभर कायम होता. तब्बल 342 मि.मी. विक्रमी पाऊस लांजात झाला. त्यामुळे लांजारत्नागिरी अशी वाहणार्‍या काजळी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. या नदीच्या परिसरात असलेल्या गावांसह चांदेराई बाजारपेठेत पूरसद‍ृश स्थिती निर्माण झाली. मंडणगडसह संगमेश्‍वर तालुक्यातही मुसळधार पावसाचा जोर होता. या दोन तालुक्यात 200 हून अधिक मि.मी. पाऊस एका दिवसात झाला.

संगमेश्‍वर तालुक्यात जोरदार पावसामुळ दुर्गम भागातील दरड प्रवण क्षेत्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील पांगरी, ओझरे, तिवरे, नायरी, पारकरवाडा, कसबा, आंबेड, मुर्शी, साखरपा,कुळे, देवळे, शिवणे, काटवली, डिंगणी आदी गावातील 27 त्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्याच बरोबर धरण क्षेत्रातील गावांनाही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. अर्जुना धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसात झालेल्या तब्बल पाचशे मि. मी. पावसाने येथील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे.

मंगळवारी गेल्या रात्रीही जोरदार पाऊस झाल्यामुळे खेड तालुक्यातील जगबूडी, रत्नागिरी तालुक्यातील काजळी, संगमेश्‍वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली या नद्या इशारा पातळीकडे झेपावल्या आहेत.पावसाचा असात अखंड जोर राहिल्यास उर्वरित नद्यांनी इशारा पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नद्यांच्या परिसरसरातील गावांना आणि वाड्यांना सावधगिरीच्या आणि खबरदारीच्या सूचनो देण्यात आल्या आहेत. तसेच किनारी गावात उधाणाचा धोका लक्षात घेऊन या गावांनाही सावधगिरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नव्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष कोकणावर

गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावासाने कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून जोरदार सक्रिय झाला. मात्र, त्यामुळे अनेक गावात पूरसद‍ृश स्थिती निर्माण झाली असल्याने नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्याने कोकणावर लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री कोकणातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांच्या ऑनलाईन संपर्कात असून त्यांच्या निर्देशानुसार संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एन. डी. आर. एफ.चे एक पथक तातडीने चिपळूण येथे तैनात करण्यात आले आहे.

एकाच दिवसात 1500 मि.मी. एकूण पाऊस

मंगळवारी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 157 मि.मी.च्या सरासरीने तब्बल दीड हजार मि.मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड 205 मि.मी. दापोली 145, खेड 74, गुहागर 77 मि.मी., चिपळूण 169 मि.मी., संगमेश्‍वर 210 मि.मी., रत्नागिरी 69 मि.मी., लांजा 342 मि.मी., राजापूर 122 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आता पर्यंत 979 मि.मी.च्या सरासरीने 8814 मि.मी. एकूण पाऊस झाला.

Back to top button