कोकण : आ. दीपक केसरकरांच्या बंडाचा वेंगुर्ले तालुक्याला फरक नाही! | पुढारी

कोकण : आ. दीपक केसरकरांच्या बंडाचा वेंगुर्ले तालुक्याला फरक नाही!

वेंगुर्ले , पुढारी वृत्तसेवा :  वेंगुर्ले तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी व महिला शिवसैनिकांनी शनिवारी तालुका कार्यालयासमोर एकवटत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ तर बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी पक्षा विरोधात बंड पुकारले असले तरी वेंगुर्ले तालुक्यात त्याचा काहीही फरक पडणार नाही, तालुक्यातील शिवसेना एकजुटीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमूख यशवंत परब यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारी, तौक्‍ते वादळ व अन्य संकटे असतानाही न डगमगता कार्य केले आहे. एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान्यता मिळविली आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी सोमवारी सावंतवाडी येथे होणार्‍या भव्य रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.

वेंगुर्ले साई दरबार हॉल येथे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. जिल्हा संघटिका जान्हवी सावंत,वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, हर्षद गावडे, वेंगुर्ले शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनील डुबळे, सचिन देसाई, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, युवासेनेचे पंकज शिरसाट, संजय गावडे, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, अनन्या धावडे, कोमल सरमळकर, अरुणा माडये, मनाली हळदणकर, सावली आडारकर, रश्मी डिचोलकर, समृद्धी कुडव, माजी सभापती सुचिता वजराटकर, नम्रता बोवलेकर, वैष्णवी वायंगणकर, रश्मी डिचोलकर, शीतल साळगावकर, हर्षा परब, रितू राऊळ, रश्मी गावडे, मनिषा नेवाळकर आदीसह अन्य पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

संदेश पारकर म्हणाले, शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत एकनिष्ठेने रहा व संघटना वाढवा. येणार्‍या काळामध्ये जि.प.,पं. स.,नगरपालिका सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे.यावेळी जान्हवी सावंत,यशवंत परब यांनीही मार्गदर्शन केले.

यशवंत परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ होणार्‍या रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातून सर्वच पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील,असे सांगितले.  आ. दीपक केसरकर यांनी बंड पुकारले तरी वेंगुर्ले तालुक्यात काहीही फरक पडणार नाही. वेंगुर्लेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहील, असेही परब म्हणाले. शिवसेना तालुका कार्यालयासमोर शिवसैनिक, पदाधिकारी व महिलांनी बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

Back to top button