रत्नागिरी : कोकण किनारपट्टीत ‘ऑरेंज अलर्ट’; चार दिवस मुसळधार; किनारी, दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना | पुढारी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीत ‘ऑरेंज अलर्ट’; चार दिवस मुसळधार; किनारी, दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा: कोकण किनारपट्टी भागात गेले दोन दिवस दमदार पावसाचे सातत्य राहिल्यानंतर येत्या 24 जूनपर्यंत रत्नागिरीसह कोकणातील अन्य जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आगामी चार दिवस रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

या कालावधीत कोकणातील किनारी भागासह दुर्गम भागात खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. येत्या चार दिवसांत कोकणातील काही भागांत वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात मोठ्या उधाणाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांसह किनारी गावातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पुढील चार दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांसह मुंबईत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 40 मि.मी.च्या सरासरीने 362 मि. मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात 43, दापोलीमध्ये 57, खेड तालुक्यात 24, गुहागरात 70 , चिपळूणात 26 संगमेश्‍वरमध्ये 37, रत्नागिरी तालुक्यात 40, लांजा आणि राजापूर तालुक्यात अनुक्रमे 30 आणि 35 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 181 मि. मी.च्या सरासरीने पावसाने दीड हजारी मजल पूर्ण केली आहे.

दिवसागणिक वाढतोय पाऊस

दिनांक                पर्जन्यमान मि.मी.
14 जून                       109
17 जून                        58
18 जून                        89
19 जून                        85
20 जून                       170
21 जून                        362
आतापर्यंत                   1633

Back to top button