रत्नागिरी : जि.प.ची रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाच गायब | पुढारी

रत्नागिरी : जि.प.ची रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाच गायब

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यान्वित करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे या रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नादुरुस्त अवस्थेत पडली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय छतावर पडलेले पाणी वाहून जाण्याच्या स्थितीत असल्यामुळे पाऊस पाणी संकलनाचे प्रशासनाला वावडे असल्याचे दिसून येते. जि.प. भवनातील या यंत्रणेचे साहित्यच जागेवर नसून गायब झाले आहे. हे साहित्य कुठे गेले यावर मात्र सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर लक्ष केंद्रित करून शासनाने पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची योजना आखली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विश्रामग्रह, पोलिस ठाणे, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायती, सार्वजनिक दवाखाने यांसह विविध शासकीय कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय करण्यात आली होती. मात्र, हार्वेस्टिंगची यंत्रणा चांगल्या प्रतीची न झाल्यामुळे व पाणी संकलन करण्यासाठी लावलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने ते निकृष्ट साहित्य अल्प कालावधीतच नाहीसे झाले आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाचा स्त्रोत हा मुख्य आधार आहे. भूजलाच्या अतिउपशामुळे आणि जिल्ह्यामध्ये भूजलाचे योग्य प्रमाणात पुनर्भरण न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत आहेत. या सर्व बाबींवर उपाय म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना देणे आवश्यक असतानाही शासकीय कार्यालयातील या पाऊस पाणी संकलन यंत्रणा आजारी पडल्या असून याबाबत प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

परिणामी, जिल्ह्यात पाऊस संकलनाचे तीन-तेरा वाजले आहेत. याकडे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद भवनाच्या इमारतीवर काही वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यात आली होती. यासाठी लाखो रुपये खर्च करून साहित्य घेण्यात आले होते. मात्र सध्या ही यंत्रणा बंद असली तरी तेथे बसवण्यात आलेले साहित्य गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे साहित्य गायब झाल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Back to top button