विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : नीलेश राणे | पुढारी

विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : नीलेश राणे

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : चिपीप्रमाणेच रत्नागिरी विमानतळ सुरू करणे हे महत्त्वाचे आहे. विद्यमान खासदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी विमानतळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.

गेले अनेक वर्ष प्रवासी वाहतुकीची प्रतीक्षा करणार्‍या रत्नागिरी विमानतळबाबत खासदार विनायक राऊत केवळ घोषणा करताना दिसत आहेत. मात्र, तो सुरु व्हावा यासाठी त्यांच्याकडून किंवा उत्तर रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडून काहीच पावले उचलली जात नाहीत. याकडे लक्ष वेधतानाच नीलेश राणे यांनी हे विमानतळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने सुरु झाले. सामान्य लोकांची तिथून ये-जा आहे आणि जास्त करून त्या विमानाचा प्रवास स्थानिक लोक करतात या गोष्टीचे समाधान आहे. पण दुसर्‍या बाजूला रत्नागिरी विमानतळ होताना दिसत नाही. कोस्टगार्डकडे हे विमानतळ सध्या आहे. मात्र, येथेही प्रवासी वाहतूक सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी कोणते प्रयत्न सुरु आहेत, जामीन अधिग्रहणचे काम पूर्ण झाले का? किती काम झाले, एअरपोर्ट सुरु करण्याची रूपरेषा काय आहे हे अजून पर्यंत खासदार विनायक राऊत कधी बोलताना दिसत नाहीत.

विद्यमान खासदारांकडून काय होईल असे वाटत नसल्याने आता येणार्‍या काळामध्ये तो प्रयत्न आम्ही करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी चा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्याची मागणी मंत्री नारायण राणे यांच्याकडे लवकरात लवकर करणार आहोत, अशी ग्वाही नीलेश राणे यांनी दिली आहे.

विमानतळ सुरू होण्यासाठी ज्यांना लक्ष घालायचे त्यांनी घालावे : ना. सामंत

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : विमानतळ लवकरच सुरु होणार आहे, हे लक्षात आल्यानेच काही लोकांनी यात लक्ष घातले आहे. कुणाला आणखी ‘फास्ट’ काम करायचे आहे त्यांनी करावे, असा टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माजी खा. नीलेश राणे यांना नाव न घेता मारला. विमानतळावरुन प्रवासी वाहतूक लवकर सुरु व्हावी यासाठीच आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खा. नीलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगताना खा. राऊत यांच्यावर टीका केली आहे. याबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की, विमानतळासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिला आहे.

जागेचा तिढाही सुटत असून, याबाबत नुकतीच आपण जमीन मालकांची बैठक घेतली. या विमानतळासंदर्भात आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाबाबत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार आहोत. प्राणी संग्रहालयाचा प्रश्न त्याचप्रमाणे युजीसीच्या मार्क्सबाबत मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा प्रश्नही आता सुटत आला आहे. त्यामुळे काही लोकांनी यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यामुळे हे काम लवकर झाले तर उत्तमच असल्याचे ना. सामंत म्हणाले.

रत्नागिरीतही हवी टोलमुक्ती

सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर एमएच-08 क्रमांकाच्या वाहनांना टोलमुक्ती मिळावी यासाठी शिवसेना आक्रमक राहणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.

Back to top button