रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संकुलास मिळणार गती | पुढारी

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संकुलास मिळणार गती

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही वर्षांपासून अर्धवटस्थितीत असलेल्या मिरजोळे एमआयडीसीतील जिल्हा क्रीडा संकुल उभारणीच्या कामास गती देण्यासाठी तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत याबाबतचा आढावा पालकमंत्री अ‍ॅड. परब यांनी घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, उपवन संरक्षक प्रियंका लगड आदींची उपस्थिती होती.

जिल्हा क्रीडा संकुलात खेळाच्या मैदानात 400 मीटर ट्रॅक तसेच फुटबॉल मैदान आदिंचे नियोजन आहे. याचे अंदाजपत्रक 18 कोटी 80 लाख रुपये इतके आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी मंजूर 15 कोटी निधीपैकी 3.45 कोटी रुपये प्राप्त झाले असून, तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर 5 कोटी पैकी 1 कोटी रुपये प्राप्त असल्याची माहिती क्रीडा अधिकार्‍यांनी बैठकीत दिली.

जिल्ह्यात खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्राप्त 1 कोटीचा निधी जिल्हा संकुल निधीस वर्ग केला आहे. या एकूण 4 कोटी 45 लाख रुपयातून या कामास सुरुवात करा, लागेल तसा निधी उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री अ‍ॅड. परब यांनी सांगितले. या निधीतून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मारुती मंदीर येथील सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास कबड्डी मैदानासाठी मॅटस्ची खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच 15 लाख रुपये खर्चून बास्केटबॉल कोर्टचे काम होणार आहे. संकुलाच्या रंगकामास आजच्या बैठकीस मान्यता देण्यात आली.

प्राणी संग्रहालयासाठी 63 कोटींची आवश्यकता

मालगुंड येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाच्या कामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. 15.49 हेक्टर क्षेत्रात हे लघु प्राणीसंग्रहालय प्रस्तावित आहे. यासाठी 63 कोटी 11 लाख रुपये निधी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नागपूर येथील मुख्यवन सरंक्षक यांच्या कार्यालयास पाठविण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री अ‍ॅड. परब यांनी दिल्या.

Back to top button