गुहागर : जयगडला होणार ‘सरपंच संसद’ | पुढारी

गुहागर : जयगडला होणार ‘सरपंच संसद’

गुहागर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासाची दिशा ठरविणारा लोकनेता म्हणजे सरपंच. त्यांना शाश्वत विकासाचे यशस्वी प्रयोग दाखविल्यास, प्रेरणा दिल्यास गावे समृध्द होतील. त्यासाठी एमआयटी, राष्ट्रीय सरपंच संसद ही संस्था काम करते. या संस्थेद्वारे कोकण विभागाची पहिली सरपंच संसद जयगडला आयोजित करत आहोत, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली.

सरपंच संसदच्या नियोजनासाठी राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश पाटील गुहागरमध्ये आले होते. या उपक्रमाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. योगेश पाटील म्हणाले की, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट या शिक्षण समूहाची 38 वर्षांपूर्वी स्थापना झाली.

एमआयटीचे संचालक राहुल कराड यांनी 2017 मध्ये एमआयटीद्वारे राष्ट्रीय सरपंच संसद या अराजकीय उपक्रमाला सुरुवात केली. कोकण विभागाची पहिली संसद जयगडमध्ये जिंदालच्या सहकार्याने घेण्याचे आम्ही नियोजन करीत आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार सन्मानित पोपटराव पवार, राहीबाई पोखरे, परशुराम गंगावणे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रण देणार आहोत.

कोकण विभागातील 1000 सरपंच यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणात शाश्वत विकासासाठी काम केलेल्या सरपंचांचे अनुभवकथन होईल. इथेनॉल निर्मितीसाठी बांबू लागवड व विविध कंपन्याच्या सीएसआर फंड मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास योजनांची माहिती, असे थेट ग्रामविकासाच्या विषयांची चर्चा संसदेमध्ये होईल, अशी माहिती योगेश पाटील यांनी दिली.

पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश म्हाते, प्रांत समन्वयक संतोष राणे, नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर उपस्थित होते. कोकण समन्वयक सुहास सातार्डेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले
होते.

Back to top button