औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण येथील जायकवाडी (नाथसागर) धरणाचे सोमवारी सायंकाळी अर्ध्या फूटाने दरवाजे उघडण्यात आले होते. पण आज  (मंगळवार) पाण्याची आवक वाढल्याने १० ते २७ पर्यंतच्या सुमारे १८ दरवाजांची उंची एक फुटाने वाढवण्यात आली आहे. धरणातून २० हजार ४५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी नाथसागर धरणाच्या पाण्याचे जलपूजन करून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार धरणाचे अर्ध्या फूटाने दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीत १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण पाण्याची आवक वाढल्यामुळे आज गेट क्रमांक १० ते २७ पर्यंतचे सुमारे १८ दरवाजांची उंची एक फूट करण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी घेतला. त्यामुळे गोदावरी नदीत १८ हजार ८६४ क्युसेक व जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९, असा एकूण सुमारे २० हजार ४५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या चनकवाडी, पाटेगाव, वडवळी, नायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी, कुराणपिंपरी या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार निलावाड यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button