पुणे : पीएमपीवर कारवाईचा आदेश; दै.‘पुढारी’च्या वृत्ताची परिवहन आयुक्तांकडून गंभीर दखल | पुढारी

पुणे : पीएमपीवर कारवाईचा आदेश; दै.‘पुढारी’च्या वृत्ताची परिवहन आयुक्तांकडून गंभीर दखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीकडून होणार्‍या बेकायदा विद्यार्थी वाहतुकीची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी पीएमपीवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी (आरटीओ) दिला आहे. दरम्यान, पीएमपी प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पीएमपी आरटीओकडून शालेय वाहतुकीचा परवाना घेणार असून, या बसमध्ये महिला वाहकाचीदेखील नेमणूक करणार आहे. पीएमपीकडून शहरात सुरू असलेल्या बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून दै. ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.

त्याची गंभीर दखल मुंबई येथे परिवहन आयुक्तांनी घेतली असून, पीएमपीने मोटार वाहन कायद्यातील नियमांची अंमलबजावणी करूनच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन करूनच करण्यात येणार असल्याचे दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

वरिष्ठ अधिकार्‍याची नेमणूक
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन होण्यासाठी पीएमपीकडून निवृत्त आरटीओ अधिकारी आणि पीएमपीएमएलचे अ‍ॅडमिन सुबोध मेडशीकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, पीएमपीकडून शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरीत्या होत आहे की नाही, यांची पाहणी करतील आणि त्याचा अहवाल पीएमपीला सादर करतील, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

शववाहिनी सेवा आता नियमानुसार
पीमपीकडून यापूर्वी शववाहिनीची बेकायदा सेवा पुरविण्यात येत होती. त्या वेळी देखील दै.‘पुढारी’ने अशा प्रकारे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत, पीएमपीकडून आता मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन करून शववाहिनीची सेवा पुरविली जात आहे.

पीएमपीच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत दै.‘पुढारी’तील वृत्त वाचले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही आम्ही करणार आहोत. मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एका वरिष्ठ अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. तसेच, या बससाठी शालेय परवाना घेण्यात येणार असून, बसचा रंग पिवळा आणि बसमध्ये महिला वाहकाची नेमणूक करण्यात येईल.

                                                          – लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष, पीएमपी

पीएमपीबाबतच्या वृत्ताची परिवहन आयुक्त, मुंबई यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात यथोचित कारवाई करण्याचा आम्हाला आदेश दिला आहे. याबाबत पीएमपीशी संपर्क सुरू आहे. पीएमपीला शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या बसगाड्यांबाबत मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील.

                                            – डॉ.अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button