औरंगाबाद : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कारागृहातून फरार | पुढारी

औरंगाबाद : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कारागृहातून फरार

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण – शेवगाव रोडवरील खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कारागृहातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात कारागृह प्रशासनाने पैठण पोलीस ठाण्यात आज (सोमवार) तक्रार दाखल केली आहे. अशोक दत्ताराव बोंगाणे (वय ३६ रा. मोंढा कोतवाल पोलीस ठाण्याजवळ, ता. परभणी) असे फरार झालेल्या कैद्याचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक बोंगाणे या कैद्याला ३०२ कलमाखाली २९ सप्टेंबर २०१४ रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यापासून तो पैठण – शेवगाव रोडवरील खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, रविवारी (दि. २७) सायंकाळी हजरीच्या वेळेस कोणास काही न सांगता बॅरक ९ मधून तो फरार झाल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी कारागृह पोलीस कर्मचारी रावसाहेब लक्ष्मण फुसे यांनी आज (सोमवार) दुपारी पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, फरार कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस बीट जमादार राजेश आटोळे करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button