एमआयडीसी उभारताना व्यापारी हित जोपासू : आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली ग्वाही | पुढारी

एमआयडीसी उभारताना व्यापारी हित जोपासू : आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली ग्वाही

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : शहरातील व्यापार्‍यांना व नागरिकांना फायदेशीर ठरेल, अशा पद्धतीने एमआयडीसी होण्यासाठी आपण सकारात्मक आहोत, असे आश्वासन आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यापार्‍यांच्या बैठकीत दिले. तालुक्यात कोंभळी, रवळगाव परिसरात एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, यानंतर कर्जत शहराच्या व्यापारी बांधवांना फायदा होईल, व्यापारात वाढ होईल, अशा पद्धतीने एमआयडीसीचे कार्यक्षेत्र असावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर कर्जत शहर व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार शिंदे यांच्या समवेत एमआयडीसी प्रश्नावर अ‍ॅड. सुधीर भापकर यांच्या निवासस्थानी रविवारी बैठक झाली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बिभिषण खोसे, सचिव प्रसाद शहा, कार्यकारिणी सदस्य सचिन कुलथे, संदीप गदादे, योगेश भापकर, संजय लाळगे, उपमन्यू शिंदे, संतोष भंडारी, गणेश जेवरे, किशोर बोथरा, काकासाहेब लांगोरे, पिंटू पवार, राहुल नवले, स्नेहल देसाई, विनोद दळवी, स्वप्निल तोरडमल यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी यावेळी उपस्थित होते.

एमआयडीसी उभारताना तिचा फायदा कर्जत शहरातील व्यापार्‍यांना व्हावा, यासाठी दहा किलोमीटरच्या आत ती व्हावी. शहराची बाजारपेठ सुधारण्यासाठी व वाढण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. सध्या प्रस्तावित एमआयडीसीचा शहरातील नागरिक व व्यापार्‍यांना पुरेसा फायदा होणार नाही, असे निदर्शनास आणून देत तसे निवेदन आमदार शिंदे यांना देण्यात आले.
यावर आमदार शिंदे म्हणाले, एमआयडीसी उभारताना शहरातील व्यापार्‍यांना फायदा व्हावा, यासाठी माझी भूमिका सकारात्मक राहील. आपल्या सूचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल. एमआयडीसी होण्यापूर्वी तहसील कार्यालयात नागरिकांनी उपस्थित राहून सूचना मांडाव्यात, असे आवाहन केले होते. यावेळी व्यापार्‍यांनी उपस्थित राहून ही भूमिका मांडण्याची आवश्यकता होती.
माझे धोरण खुले व पारदर्शक आहे. ज्या परिसरात एमआयडीसी होणार आहे किंवा होईल, त्या ठिकाणी माझी जमीन नाही. त्यामुळे माझा वैयक्तिक रस नाही.

समितीला ती जागा योग्य वाटली

परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, शासनाच्या नियमानुसार किमान 1200 एकर साधी गायरान जमीन मिळावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. एकूण सहा जागांची पाहणी झाली होती. त्यातील समितीला सध्या प्रस्तावित होत असलेली जागा योग्य वाटली. तरीही आपल्या सूचनांचा निश्चितपणे विचार करेल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी व्यापार्‍यांना दिले.

हेही वाचा

 

Back to top button