साईभक्तांच्या परिक्रमेने शिर्डी परिसर मंत्रमुग्ध | पुढारी

साईभक्तांच्या परिक्रमेने शिर्डी परिसर मंत्रमुग्ध

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  ढोल-ताश्यांचा गजर, साईनामाचा जयघोष, दोनशे छत्रीधारी, फिरत्या वाहनांवर कसरती करणारे मल्ल, शाळकरी मुलांनी साकारलेला श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा… त्यातच ठिकठिकाणी काढलेली रांगोळी आणि त्या वरून दिमाखात जाणारा साईंचा रथ अशा साईभक्तीने मुग्ध झालेल्या वातावरणात आणि साधू-संतांच्या सहवासात आज (मंगळवारी) 14 किलोमीटरची शिर्डी साई परिक्रमा उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. साईबाबांची कर्मभूमी असलेल्या शिर्डीला साधू-संतांच्या सहवासात लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात खंडोबा मंदिरातून पहाटे या परिक्रमेची सुरवात शंखनादाने झाली. शिर्डीचे ग्रामस्थ, ग्रीन अँड क्लीन फौंउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिर्डी साई परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्रमेसाठी देशभरासह विदेशातूनही भाविक आले होते. साईबाबांच्या शिर्डीची 14 किलोमीटरची ही परिक्रमा वर्षातून एकदा मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येत असते. पहाटे 5च्या सुमारास खंडोबा मंदिरातून त्याची सुरवात झाली.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंद महाराज, ओम गुरुदेव जंगलीदास महाराज संस्थानचे स्वामी स्वरूपानंद, साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मुख्याधिकारी सतीश दिघे, ग्रीन अँड क्लीनचे अध्यक्ष अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, अ‍ॅड. अनिल शेजवळ आदींसह भाविक उपस्थित होते. आरती करून परिक्रमेला सुरवात झाली. पहाटे शिर्डीत शंखनाद, ढोल ताश्यांचा निनाद, ओम साई जय साईचा जयघोष सुरू झाल्याने भाविक साईभक्तीत न्हाऊन निघाले. पहाटेच्या तांबड्यात रतलामवरून आलेले 200 छत्रीधारी शोभून दिसत होते.

फिरत्या वाहनावर कसरती करणारे मल्ल भाविकांचे लक्ष वेधत होते. आकर्षक साईंचा रथ मोहित करत होता. शिर्डीतील शाळकरी मुलांनी साकारलेला श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचा सुबक फिरता देखावा लक्ष वेधत होता. परिक्रमा मार्गावर रांगोळ्या काढण्याचे काम साई निर्माण उद्योग समूहाने केले. रस्त्यामध्ये जागोजागी सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले होते. स्वयंस्फूर्तीने काही नागरिकांनी भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. सुमारे 16 ठिकाणी वैद्यकीय पथक ठेवण्यात आले होते. त्याबरोबर परिक्रमेसमवेत फिरते वैद्यकीय पथकही होते. शिर्डी गावाच्या परिक्रमा मार्गावर असणार्‍या पिंपळवाडी, रुई, कणकुरी, साकुरी, निघोज या ग्रामस्थांनी भाविकांच्या स्वागताला कमानी उभारल्या होत्या. शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केल्याने परिक्रमा शिस्तीत, विनाअडथळा पार पडली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास साई मंदिराजवळील 16 गुंठ्यांत परिक्रमेचा समारोप झाला. ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने सहभागी भाविकांना लाडू-चिवडाचा प्रसाद वाटण्यात आला.

साई परिक्रमेतून पुण्याचा लाभ : रामगिरी महाराज
तीर्थक्षेत्री जाऊन मंदिराला प्रदक्षिणा केल्याने पुण्य मिळत असतेच. मात्र तीर्थक्षेत्री जाऊन त्या गावाची परिक्रमा केल्यास पुण्यात वाढ होऊन ऊर्जाही मिळते, असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

Back to top button