मध्य प्रदेशातून येतात गावठी पिस्तूल | पुढारी

मध्य प्रदेशातून येतात गावठी पिस्तूल

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गावठी गुन्हेगारी क्षेत्रात गावठी पिस्तुलाचा सर्रास वापर होऊ लागला आहे. गेल्या वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 56 गावठी कट्टे पकडले. जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा पुरवठा मध्यप्रदेशातून होत असून, स्थानिकांच्या मदतीने कट्ट्यांची विक्री होत असल्याचे सूत्रांकडून समजले. जिल्ह्यात गावठी कट्ट्याचा धाक दाखवून, गाठवी कट्ट्यातून गोळीबार करून खून, खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पूर्वी श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव तालुक्यात गावठी कट्ट्यांचा वापर होत होता. परंतु, आता जामखेड, कर्जत, नगर तालुका, पारनेर सारख्या तालुक्यातील गुन्हेगार गावठी पिस्तुलाचा वापर करीत असल्याचे गेल्या काही महिन्यांपूर्वी घटनांवरून दिसून येते. गुन्हेगार आणि गावठी कट्टा हे समीकरण आता सर्रास झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी व्यापक मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. सन 2023 मध्ये गावठी कट्ट्याचे सुमारे 140 गुन्हे दाखल झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गावठी कट्टे विक्रीला आणार्‍या 54 जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 53 गावठी गट्टे जप्त केले आहेत.

दहा हजाराला खरेदी, विक्री 30 हजाराला
उमरठी, बर्‍हाणपूर भागातून गावठी कट्टा आठ ते दहा हजाराला खरेदी केला जातो. सराईत गुन्हेगार गावठी कट्टे आणण्यासाठी मोटारसायकलीवर उमरठीला जातात. गावठी कट्टे खरेदी करून नगरसह शेजारी जिल्ह्यात 25 ते 30 हजाराला विक्री केली जाते. उमरठी अतिशय दुर्गम भागात असल्याने पोलिस तपासा तिथंपर्यंत पोहोचत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

उमरठी गावठी कट्ट्याचे केंद्र
मध्यप्रदेशातील तापी नदीच्या काठावरील उमरठी हे गावठी कट्ट्याचे केंद्र असून, तेथून गावठी कट्टे नगरसह महाराष्ट्रात विक्रीसाठी येतात. उमरठी व बर्‍हाणपूर भागात विशिष्ट समाजाचे लोक गावठी बनावटीचे पिस्तूल बनवतात. त्यांच्याकडून स्थानिक गुन्हेगार गावठी कट्टे आणून अहमदनगर जिल्ह्यासह शेजार्‍याच्या जिल्ह्यात विक्री करतात.

Back to top button