वॉरंट असलेल्यांची राहुरीत धरपकड ! | पुढारी

वॉरंट असलेल्यांची राहुरीत धरपकड !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी न्यायालयाचे अटक वॉरंट असलेल्या 134 जणांपैकी 17 जणांना अटक करुन पो. नि. संजय ठेंगे यांनी पोलिस ठाण्यातून न्यायालयात बेड्या ठोकून पायी नेल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. राहुरी पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात गुन्हेगारांची वाढती वर्दळ तर पोलिसांना हवे असलेले आरोपी बिनदिक्कतपणे पोलिस ठाण्यात खुलेआम फिरत होते. दरम्यान, या पोलिस ठाण्याचा कारभार नव्याने हाती घेताच पो. नि. ठेंगे यांनी गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांवर अनोखा प्रयोग सुरू केला. पोलिस ठाण्यातून आरोपींना बेड्या ठोकत न्यायालयात नेले जात आहे. शहरातून बेड्या ठोकून पायी नेल्याने गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे.

न्यायालयामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये हजर न राहणारे 134 जणांविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले, मात्र यावर कारवाई होत नसल्याने आरोपी मोकाट फिरत होते. अखेर ठेंगे यांनी अटक वॉरंट आरोपींची फाईल हाती घेतली. 134 पैकी 17 आरोपींना अटक करुन, न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांसह न्यायालयास चकवा देण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकून शहरातून पायी फिरविले. दरम्यान, राहुरी पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरु केल्याने राहुरी पोलिस ठाण्याला आता खमक्या पोलिस अधिकारी मिळाल्याची चर्चा सुरु आहे. राहुरीत खून, दरोडे, चार्‍ेया, महिला अत्याचाराचे अनेक प्रकार घडतात. दुचाकी, चारचाकी चोरट्यांनी सर्वसामान्यांना त्रस्त केले आहे. राहुरी परिसरात गुन्हेगारी कमी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य राहुरीकरांना आहे. यामुळे ठेंगे यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Back to top button