अबब… एका वर्षात 1862 दुचाकींची चोरी ; सापडल्या अवघ्या 278 | पुढारी

अबब... एका वर्षात 1862 दुचाकींची चोरी ; सापडल्या अवघ्या 278

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर : जिल्ह्यात दुचाकी चोरी आता नित्याचीच झाली आहे. जिल्ह्यातून दिवसाला सरासरी पाच दुचाकी चोरीला जात असल्याचा भयावह आकडा पोलिस दप्तरातून समोर आला आहे. त्यात 2023 मध्ये सुमारे 1862 दुचाकींची चोरी झाली. तर, अवघ्या 278 दुचाकी तपासाअंती मिळाल्या. त्यामुळे पोलिसाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे दररोज सरासरी पाच गुन्हे दाखल होत आहेत. दुचाकी चोरीला गेल्यानंतर फिर्याद एक ते दोन दिवस आधी दुचाकीचा शोध घेतात. त्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन दुचाकी चोेरीला गेल्याची फिर्याद देतात. पोलिसांनीही आता दुचाकी चोरी नित्याचीच झाली आहे. फिर्याद दाखल केल्यानंतर काही दिवस फिर्यादी त्याचा पाठपुरावा करतो. मात्र, त्यानंतर तोही पोलिस ठाण्याकडे फिरकत नाही.

त्यामुळे दुचाकी चोरीचा आकडा पोलिस ठाण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील शहर दुचाकीचोरांचे अड्डे बनले आहेत. तर, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणांहूनही दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, नेवासा आदी ठिकाणांहून दुचाकी मोठ्या प्रमाणात दुचाकीला जातात. दुसरीकडे पोलिस तपासातही दुचाकी मिळून येत नाही. कारण चोर दुचाकीचे स्पेअरपार्ट सुटे करून विक्री करतात. त्यामुळे गुन्ह्यातील मुद्देमालच मिळत नाही, असे तपासात समोर आले आहे.

सराईत गुन्हेगारांकडे चोरीची दुचाकी
जिल्ह्यात रस्तालूट, जबरी चोरी, धूमस्टाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांकडेही चोरीच्या दुचाकी असल्याचे अनेक वेळा पोलिस तपासात निष्पन्न झालेले आहे. गुन्हेगार अनेक वेळा पेट्रोल संपल्यानंतर त्याच जागेवर दुचाकी सोडून दुसर्‍या वाहनाने पळ काढतात.

2 दिवसांत दुचाकी भंगारात
चोरीला गेलेली दुचाकी दोन दिवसांत भंगाराच्या दुकानात जाते. दुचाकीचे दोन्ही डिस्क काढून विकले जातात. तसेच, दुचाकी पेट्रोल टाकी काढून विकली जाते. तसेच उर्वरित स्पेअरपार्ट भंगारात नेऊन विकले जातात. भंगारात दुचाकी विकून चोरांना चांगले पैसेही मिळतात आणि पुरावाही राहत नाही, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हॉस्पिटलचेे पार्किंग स्पॉट टार्गेट
नगर शहरासह जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी अशी मोठ्या शहरातील हॉस्पिटल पार्किंग दुचाकी चोरांसाठी स्पॉट टार्गेट आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरणे सोपे जाते. नगर शहरातील खासगी हॉस्पिटलसह जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधूनही दुचाकी चोरी प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्पे्र मारून दुचाकी चोरून नेली जाते.

एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात
दुचाकी चोरणार्‍या सराईत टोळ्या आहेत. नगर जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी थेट पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड जिल्ह्यात नेऊन विक्री केली जाते. तर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी नगर जिल्ह्यात आणून विक्री केल्या जातात. त्यातही दुचाकी अगदी चार ते पाच हजारात विक्री केली जाते.

Back to top button