कर्जबाजारी भूषणला नको ती अवदसा आठवली अन्… | पुढारी

कर्जबाजारी भूषणला नको ती अवदसा आठवली अन्...

अनिकेत पावसकर, रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेत भूषण खेडेकर (वय 42, रा. दत्त मंदिरसमोर, खालची आळी, रत्नागिरी) हा आपले त्रिमूर्ती ज्वेलरीचे दुकान चालवत होता. त्याचा हा वडिलोपार्जित व्यवसाय बर्‍यापैकी चालत होता. मात्र, काही कारणास्तव भूषण कर्जबाजारी झाला. अनेकांकडून छोट्या-मोठ्या रकमा हातउसन्या घेतल्याने त्याच्या डोक्यावर जवळपास दीड-दोन लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. तशातच देणेकर्‍यांनीही आपापल्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. या प्रसंगातून काही ना काही मार्ग निघाला असता, मार्ग काढता आला असता; पण कर्ज भागविण्यासाठी भूषणला नको ती अवदसा आठवली आणि बुडत्याचा पाय नुसता खोलात नाही, तर भयंकर गर्तेत कोसळला.

मुंबई येथील कीर्तिकुमार अजयराज कोठारी हा एक सोन्या-चांदीचा व्यापारी नित्यनेमाने रत्नागिरीत यायचा. त्याच्याकडील काही दागिने तो इथल्या सराफांना विकायचा, त्यांच्याकडील काही दागिने विकत घ्यायचा, असा त्याचा व्यवसाय होता. तो आला म्हणजे एकाचवेळी त्याच्याकडे दीड-दोन किलो सोन्याचे दागिने असायचे. आपले कर्ज भागविण्यासाठी या कीर्तिकुमारलाच लुटायचा आणि त्याचा खून करायचा भूषणने प्लॅन रचला. त्यासाठी आपले दोन साथीदार रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, रा. मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी), फरीद महामूद होडेकर (36, रा. खोतवाडी-भाट्ये, रत्नागिरी) या दोघांना आपल्या कटात सामील करून घेतले. नेहमीप्रमाणे कीर्तिकुमार अजयराज कोठारी हा व्यापारी सोमवार, दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास भूषणच्या दुकानात आला.

सुरुवातीला व्यापाराशी संबंधित काही बोलाचाली झाल्या. मात्र, भूषणचे साथीदार आधीच दबा धरून बसले होते. कीर्तिकुमार भूषणशी बोलत असताना अचानक तिघांनी मिळून झडप घालून कीर्तिकुमारचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्याकडील सोने आणि चांदी काढून घेत कीर्तिकुमारचा मृतदेह दुकानातच ठेवून ते आपापल्या घरी गेले. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यापैकी काही सोने रातोरात भूषणच्या घरामध्ये नेऊन वितळवून त्याची लगड तयार केली. त्यानंतर रात्री उशिरा कीर्तिकुमारचा मृतदेह महेश चौगुलेच्या रिक्षातून अबलोली येथे टाकून दिला. कीर्तिकुमारकडून लुटलेले काही सोने विकून एक-दोन दिवसांत भूषणने त्याचे सगळे कर्ज भागवून टाकले; पण त्याने जे महापाप केले होते, ते लवकरच त्याच्या मानगुटीवर बसणार होते.

दरम्यानच्या काळात कीर्तिकुमारचा कोरणाही संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा करण कोठारी हा रत्नागिरीत दाखल झाला. रत्नागिरीत येऊन त्याने वडील ज्या लॉजमध्ये उतरले होते, तेथे चौकशी केली; पण कीर्तिकुमारचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे शेवटी त्याने शहर पोलिस ठाण्यात कीर्तिकुमार बेपत्ता झाल्याची खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शहरातील बर्‍याच सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. पोलिसांनी कीर्तिकुमार यांचा तपास करताना शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्यावेळी एक बाब पोलिसांच्या लक्षात आली की, घटनेच्या दिवशी त्या रात्री 8.24 वाजता कीर्तिकुमार हे भूषणच्या त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये जाताना दिसून आले. परंतु, पुन्हा बाहेर येताना दिसले नाहीत. त्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दुकानमालक भूषण खेडकरसह या गुन्ह्यात त्याला मदत करणार्‍या अन्य दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच भूषणने दोन साथीदारांच्या मदतीने कीर्तिकुमार कोठारी यांना दोरीने गळा दाबून ठार मारल्याचे कबूल केले. सध्या हा खटला न्यायालयात सुरू असून, या गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. कर्ज काय आजचे उद्या भागवता आले असते; पण कर्जबाजारीपणा संपविण्यासाठी भूषणने जो मार्ग पत्करला तो त्याचे उभे आयुष्यच उद्ध्वस्त करून गेला.

Back to top button