Nagar Crime News : दीड लाखाची बाईक 10 हजारांत; चोराचा अजब फंडा | पुढारी

Nagar Crime News : दीड लाखाची बाईक 10 हजारांत; चोराचा अजब फंडा

नगर : पुढारी वृत्तसेवा : महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात, जंगलात, डोंगराळ भागात लपवायची. अडणी, गावाकडच्या माणसाला ती पाच ते दहा हजारात विक्री करायची. नगर व औरंगाबाद शहरातून महागड्या दुचाकी चोरणार्‍या नेवासा फाटा येथील दोघांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 5 लाख 50 हजारांच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. अधिक माहिती अशी, 7 डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची महागडी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती.

गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली की, वरील दुचाकी चोरीचा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केला असून, ते नेवासा भागात सापडतील. त्यानुसार तपास करून कोतवाली पोलिस पथकाने अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर (दोघे रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून तीन, संभाजीनगर येथून तीन अशा सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून पाच लाख 50 हजारांच्या 6 दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या. या दुचाकी वैभव अनिल घोरपडे (रा. बांबू गल्ली नगर), अदनान मन्सूर शेख (रा. झेंडीगेट, नगर), सचिन साहेबराव जोगदंडे (रा. छत्रपती संभाजी नगर), रामदास रांजणे (रा. संभाजीनगर), मिठू श्रीपाद वाल्लेकर (रा. इस्लामपूर, नगर) यांच्या असून एका वाहनाचे मालकाचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, वंदना काळे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button