Nagar : जलजीवन योजनेची कामे निकृष्ट | पुढारी

Nagar : जलजीवन योजनेची कामे निकृष्ट

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  जलजीवन मिशन योजनेंतर्गत शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाणीयोजनांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. चेडे चांदगाव येथील कामबाबत ग्रामस्थांनी अभियंता व गटविकास अधिकार्‍यांपुढे तक्रारींचा पाढाच वाचला आहे.
चेडे चांदगाव येथे पाण्याची टाकी व जलवाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट केल्याने ग्रामस्थांनी शेवगावच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे. परंतु ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे संपूर्ण टाकी पाडून नवीन टाकी बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना गटविकास आधिकार्‍यांनी दिले.

जलवाहिनी तीन फूट जमिनीत गाडणे आवश्यक असताना दीड फुटांवर गाडून थातूरमातूर काम केले. ठेकेदार आणि अधिकार्‍यांनी संगनमताने या योजनेचा बोजवारा उडविला आहे. यासंदर्भात श्रीधर चेडे, रामेश्वर चेडे, श्रीराम गरगडे, हनुमान चेडे, बाबासाहेब गोंधळी, प्रल्हाद चेडे, संभाजी चेडे, गणेश पवार, बाबासाहेब नागरे, गोरक्षनाथ बोरूडे आदी ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली आहे.

टाकीचे काम पुन्हा करणार
चेडे चांदगाव येथील ग्रामस्थांनी जलजीवन कामाबाबत तक्रार अर्ज केला आहे. त्या अनुषंगाने टाकीचे काम टेक्निकल बाब असल्याने पूर्णपणे पाडून नव्याने टाकीचे काम करण्यात येईल. तसेच, जलवाहिनीच्या कामासंदर्भात पाहणी करून ठेकेदारांना सूचना देण्यात येतील, असे शेवगावचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सांगितले.

अनेक गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत
जलवाहिनीच्या खोदकामामुळे अनेक गावांतील सुस्थितीत असलेल्या पाणीयोजनांची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास याला जबाबदार कोण? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Back to top button