Nagar News : आता घरूनच बजावता येईल मतदानाचा अधिकार | पुढारी

Nagar News : आता घरूनच बजावता येईल मतदानाचा अधिकार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाणे अशक्य असलेल्या 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आता घरूनच मतदान करण्याची खास सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी मतदानाच्या दिवशी निवडणूक पथक थेट त्यांच्या घरी जाऊन मतदान करवून घेणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांना मतदान केंद्रावर जाणे शक्य नसते.

संबंधित बातम्या :

त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. या ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणाच थेट त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक अर्ज भरून घेतला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पथक घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. पुणे शहरात नुकत्याच झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत अशी सुविधा दिली होती, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेने शुक्रवारी 35 लाख 71 हजार 312 मतदारसंख्या असलेली प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.

विद्यार्थिसंख्येची होणार गणती
जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 1 लाख 78 हजार युवक आहेत. मात्र, 42 हजार युवकांचीच मतदारनोंदणी झालेली आहे. मतदारनोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयांशी संपर्क साधला जात आहे. येत्या काही दिवसांत महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशसंख्या आणि मतदारनोंदणी यांची पडताळणी केली जाणार आहे. मतदारयादीत दुर्लक्षित घटकांचा समावेश व्हावा यासाठीही जिल्हा निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button