निपाणीतून दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बससेवा बंद; कोगनोळीजवळ पोलिस बंदोबस्त | पुढारी

निपाणीतून दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बससेवा बंद; कोगनोळीजवळ पोलिस बंदोबस्त

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. ठिकठिकाणी बस जाळपोळीच्या घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून निपाणी आगारातून महाराष्ट्रात जाणाऱ्या आंतरराज्य एसटी बसच्या तब्बल २४९ फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे निपाणी आगाराला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. आंदोलनामुळे अनेक लांब पल्याच्या बस स्थानकात उभ्या होत्या. पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार असल्याची माहिती निपाणी आगार व्यवस्था बी. एस. संगापा यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली. दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी केल्याने पोलिस प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

संबंधित बातम्या 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्यातील उमरगा (धाराशीव) येथे आंदोलकांनी कर्नाटकाची एक बस पेटवून दिल्याने महाराष्ट्रातील बससेवा बंद करण्यात आली. अचानक बंद झालेल्या आंतरराज्य बससेवेमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बस बंद झाल्याने त्यांना खाजगी वडापचा आधार घ्यावा लागला. निपाणी आगारातून निपाणी-इचलकरंजीला जाणाऱ्या बसेस केवळ बोरगावपर्यंत जात होत्या. तर आगारातून महाराष्ट्र सिमाभागातील गावापर्यंत केवळ स्थानिक बससेवा सुरू होती. बससेवा ठप्प झाल्यामुळे निपाणी बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी दिसत होती.

महाराष्ट्र बस सेवाही ठप्प

गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात ८० पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळीमुळे राज्यातील बस वाहतूक पूर्णत: बंद आहे. तसेच सिभाभागात काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी व कन्नड भाषिकांत निर्माण होत असलेली परिस्थिती लक्षात घेता परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बस फेल्या रद्द केल्या. त्यामुळे महाराष्ट्र आगाराच्या बसेस थांबल्याने शुकशुकाट दिसून येत होता.

कोगनोळी टोलनाक्यावर कडक पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू असेलेले आंदोलन तसेच महाराष्ट्राच्या तीन मंत्री व खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १ रोजी होणाऱ्या ‘काळा दिन’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मंगळवारी दुपारी टोलनाक्यास अतिरीक्त जिल्हा पोलिसप्रमुख वेणूगोपाल, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी भेट दिली. यावेळी पोलिसप्रमुख वेणुगोपाल यांनी विविध सुचना केल्या आहेत.

Back to top button