Nilesh Lanke : साहेबांच्या बैठकीत लंकेंचा दूत! | पुढारी

Nilesh Lanke : साहेबांच्या बैठकीत लंकेंचा दूत!

नगर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांनी मुंबईत बोलावलेल्या लोकसभा आढावा बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले आ. नीलेश लंके यांचे दूत उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बैठकीत चर्चेदरम्यान आ. लंकेंचा विषय निघताच ते शरद पवारांसोबत असून त्यांना सोडू शकत नाही, असे पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे म्हणाले. त्यावर ‘हे तुम्ही नाही, तर त्यांना सांगू द्या,’ असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आता लंके काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत.

याच बैठकीत नगर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आ. रोहित पवार, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, पाथर्डीचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेला आली. त्याच वेळी डॉ. अनिल आठरे यांनीही लोकसभा लढविण्याची तयारी दर्शविली. नगरच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच शरद पवारांनी संभाव्य उमेदवाराची चाचपणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अंकुश काकडे, बाळासाहेब पाटील या वेळी उपस्थित होते.

आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, अरुण कडू, संदीप वर्पे, अमित भांगरे नगरचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पवार यांनी नगरच्या राजकीय परिस्थितीची माहिती स्थानिकांकडून घेतली. जिल्हाध्यक्ष फाळके हे नगरची स्थिती मांडत असतानाच गतवेळच्या बैठकीचा संदर्भ देत आ. लंकेंचा विषय छेडला; मात्र ते आता आपल्यासोबत नसल्याचे ते म्हणाले. लंकेंसदर्भात चर्चा सुरू असतानाच पारनेरमधून कोण आले, अशी विचारणा झाली. त्यावर बाजार समितीचे सभापती तथा पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उठले.

‘आ. लंके हे आजही होर्डिंगवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो वापरतात. ते शरद पवारांना सोडू शकत नाही. ते तुमच्याच सोबत आहेत,’ असे सांगितले. मात्र त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘हे त्यांना सांगू द्या, तुम्ही नका सांगू’ असे स्पष्ट केले. तसा निरोप दसर्‍यापर्यंत द्यावा, अशी चर्चा या वेळी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाबाजी तरटे हे आ. लंके यांचे ‘खास’ असून ते ‘दूत’ म्हणूनच बैठकीत असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, शरद पवारांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र निर्णय काही दिला नाही.

शिर्डीत ठाकरेंच्या सेनेचाच उमेदवार

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे गटात गेले असले तरी ही जागा शिवसेनेला (ठाकरे गट) देण्याचे संकेत मुंबईतील या बैठकीत राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विखे-लंके संभाव्य लढतीकडे लक्ष!

अनेक दिवसांपासून वेध लागलेली विखे-लंके लढत राज्याला पाहायला मिळणार का? सध्या तरी विखेंच्या विरोधात लंके यांच्याकडेच प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

घुले समर्थकही बैठकीला हजर

शेवगावचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे आणि कार्यकर्ते काकासाहेब नरोडे यांच्याकडे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे समर्थक म्हणून पाहिले जाते. हे दोघेही शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. ‘आम्ही तुमच्यासोबत’ असल्याचे दोघांकडून सांगण्यात आले. या दोघांचे हे बोल घुलेंचेच का? असा प्रश्न अनेकांना पडला. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घुले बंधूंनी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. आता घुले नेमकी कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच नरोडे, नेमाणे यांची शरद पवारांच्या बैठकीत उपस्थिती, म्हणजे घुले बंधूंची ‘घरवापसी’ तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा

नाशिक : खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी

Nagar News : ‘ते’ पान स्टॉल अखेर पोलिसांनी केले बंद!

World Osteoporosis Day : म्हातारपणीच नव्हे, कमी वयातही होताहेत हाडे ठिसूळ

Back to top button