Nagar News : मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त घटस्थापना | पुढारी

Nagar News : मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त घटस्थापना

पाथर्डी तालुका :पुढारी वृत्तसेवा : मोहटा देवी माता की जय.., असा जयघोष करत हजारोच्या संख्येने आलेल्या मोहटादेवी भक्तांच्या साक्षीने मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त घटस्थापना देवस्थान समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 11 वाजता देवी मंदिर गाभार्‍यात मुख्य धार्मिक विधी देवस्थानच्या पुजार्‍यांच्या मंत्र उच्चारात पार पडला. यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, अ‍ॅड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, श्रीराम परताणी, अनुराधा केदार, शशिकांत दहिफळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मोहटे गावातून देवीचा सोन्याचा मुखवटा वाजत गाजत देवी गडावर आणण्यात येतो. गावामध्ये रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, टिपर्‍या असे सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती, दर्शन सोहळा आयोजित केला जातो. यावेळी विश्वस्त बाळासाहेब दहिफळे, अक्षय गोसावी, प्रतिभा दहिफळे आदी उपस्थित होते. भूषण साखरे, भास्कर देशपांडे, नारायण सुलाखे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी घटस्थापनेचे पौरोहित्य केले. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वयंभू मूर्तीवर सोन्याचा मुकुट (तांदळा) चढवला जातो. देवीला साडी नेसवली जाते, यांनांतर सोन्याचे दागिने चढवले जातात, सोन्याचा टोप चढवला जातो. देवीच्या नाकात नथ, सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात, त्यामुळे देवीचे वेगळे रूप नवरात्रीमध्ये भक्तांना पाहावयास मिळते.

Back to top button