दारू पिण्यास विरोध करणं बेतलं त्याच्या जीवावर ! सख्ख्या भावानेच केला खून | पुढारी

दारू पिण्यास विरोध करणं बेतलं त्याच्या जीवावर ! सख्ख्या भावानेच केला खून

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  कौटुंबिक वादातून मोठ्या सख्ख्या भावाने लहान भावाची डोक्यात कुर्‍हाड घालून निर्घृण हत्या केली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथे सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. नीलेश विष्णू फुंदे (वय 24) असे मयताचे, तर बाबाजी विष्णू फुंदे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. नीलेश हा झोपेत असताना बाबाजी याने कुर्‍हाडीच्या साह्याने डोक्यात दोन जबर घाव घालून जागीच ठार केले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, कृष्णा बडे, लक्ष्मण पोटे, किरण बडे, किशोर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, नीलेश म्हस्के, विजय काळोखे, विनोद मासळकर या पोलिस पथकाने बाबाजी फुंदे याला ताब्यात घेऊन अटक केली.

संबंधित बातम्या :

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू काशिनाथ फुंदे हे फुंदे टाकळी येथील खिळा वस्तीवर राहतात. त्यांना बाबाजी व नीलेश अशी दोन मुले असून, शेती व्यवसाय करून ते उपजीविका करतात. मोठा मुलगा बाबाजी हा दारू पिण्यासाठी वेळोवेळी पैसे मागत असे. पैसे न मिळाल्यास तो आई-वडिलांशी वाद घालत असे. लहान मुलगा नीलेश हा त्याला वाद घालू नको म्हणून नेहमी समजावून सांगत असे. नेहमीच समजावून सांगतो, म्हणून बाबाजीला नीलेशचा राग होता.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास बाबाजीने दारू पिण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागितले. तुम्ही मला पैसे देत नाहीत. मात्र, नीलेशला नेहमीच पैसे देता. त्याला एकदाचा संपवूनच टाकतो, असे म्हणत बाबाजीने घरातील कुर्‍हाड घेऊन झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घाव घातला. कुर्‍हाडीच्या घावाने गंभीर जखमी झालेला नीलेश जागीच बेशुद्ध झाला होता. शेजार्‍यांच्या मदतीने त्याला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला नगरला हलविण्यास सांगितले. नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच नीलेश मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा बाबाजी फुंदे याच्याविरोधात पाथर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Back to top button