दक्षिणेवरून वाद; नगरसह उत्तरेत वेट अँड वॉच | पुढारी

दक्षिणेवरून वाद; नगरसह उत्तरेत वेट अँड वॉच

नगर; पुढारी वृत्तसेवा : भाजप ‘मिशन लोकसभा 2024’ हाती घेत नगरसह महाराष्ट्र पिंजून काढत आहे. संघटनात्मक बांधणी करत बूथ, शक्तिकेंद्र प्रमुखांसह वॉरियर्स नियुक्त केले; पण अजूनही उत्तर जिल्हा व नगर शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नाही. नगर दक्षिणेचे अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर अंतर्गत गटबाजी उफाळून आली. तो वाद थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोर्टात पोहचलाय. मात्र त्यांनीही त्यावर ‘निकाल’ दिलेला नाही. बहुधा त्याच कारणामुळे नगर शहर व उत्तरेची कार्यकारिणी जाहीर करण्याचे धाडस जिल्हाध्यक्ष करत नसावेत, अशी चर्चा आहे.

नगर जिल्ह्यात उत्तर-दक्षिण व नगर शहर असे तीन अध्यक्ष भाजपने नियुक्त केले आहेत. महिनाभरापूर्वी या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केल्या. दक्षिणेची जबाबदारी दिलीप भालसिंग, उत्तरेची विठ्ठलराव लंघे, तर नगर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर यांची नियुक्त केली गेली. नियुक्तीनंतर या तिघांही अध्यक्षांनी कार्यकारिणी जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र भालसिंग वगळता लंघे-आगरकर यांनी कार्यकारिणी जाहीर केलेली नाही.

वादाचे कारण

दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर शेवगाव-पाथर्डी तालुकाध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून वाद निर्माण झाला. भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या मतदारसंघातील या नियुक्त्यांना राजळे समर्थकांनी आक्षेप घेतला. भालसिंग यांच्या वाळकी येथील निवासस्थानी धाव घेत त्यांना जाब विचारला. त्यानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. बावनकुळे नगर दौर्‍यावर आले, पण या नियुक्तीवर काही तोडगा निघाला नाही. बहुतेक याच कारणामुळे उत्तर व नगर शहर जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती रखडली असावी, अशी चर्चा सुरू आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांशी चर्चा करून शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाईल. गणेशोत्सव आणि प्रदेशाध्यक्षांचा दौरा यामुळे कार्यकारिणीस विलंब झाला. कोणाचाही दबाव नाही. संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेला वेळ देणारे पदाधिकारी नियुक्ती केली जाईल. मागील घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. नव्या-जुन्यांचा मेळ घालून कार्यकारिणी लवकरच जाहीर करू.

– अ‍ॅड. अभय आगरकर, अध्यक्ष, नगर शहर

जुन्या-नव्यांचा मेळ घालून सर्वसमावेशक कार्यकारिणी येत्या आठवडाभरात जाहीर होईल. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा, विचार विनीमय करून मगच निर्णय घेतला जाईल. कार्यकारिणी जाहीर करण्याला विलंब झाला, हे खरे आहे. मात्र सर्वांशी चर्चेअंती निर्णय घेतला जाईल. कार्यकारिणी जाहीर करावी यासाठी प्रदेश पातळीवरूनही विचारणा होत आहे. अनेक इच्छुक, शिष्टमंडळे येऊन भेटतात. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. आता कार्यकारिणी जाहीर केली जाईल.

– विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष, नगर उत्तर

हेही वाचा

Pune News : तुम्ही पोलिसांचा नावलौकिक वाढवला! पोलिस आयुक्तांकडून कौतुक

जपानच्या चंद्रावरील यानाने दाखवली पृथ्वीची झलक

Pune Fire News : पुण्यातील धायरी-नांदेड रस्त्यालगतच्या कारखान्याला भीषण आग; ५ अग्निशमन वाहने ३ टँकर घटनास्थळी दाखल

Back to top button