जपानच्या चंद्रावरील यानाने दाखवली पृथ्वीची झलक | पुढारी

जपानच्या चंद्रावरील यानाने दाखवली पृथ्वीची झलक

टोकियो : भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या घवघवीत यशानंतर आता जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष जपानच्या चांद्रमोहिमेकडे आहे. सहा महिन्यांच्या दीर्घ मोहिमेवर गेलेल्या जपानच्या ‘स्लिम’ यानाच्या लँडरने पृथ्वीचे पहिले छायाचित्र टिपून पाठवले आहे. स्लिमच्या लँडरने टिपलेल्या या छायाचित्रात अर्धीच पृथ्वी दिसून येत आहे. अर्थात तरीही ती अतिशय सुंदर दिसते!

स्लिम लँडरला 6 सप्टेंबरला एच-2ए रॉकेटने पाठवण्यात आले होते. यानाने पृथ्वीच्या कक्षेत राहून अनेक चाचण्या यशस्वीरीत्या पार करून सुरुवातीचे अडथळे बाजूला केले होते. स्लिमने चाचणीचा एक भाग म्हणूनच पृथ्वीचे हे छायाचित्र टिपून घेतले आहे. याच कॅमेर्‍याच्या सहाय्याने लँडरचे चांद्रभूमीवर लँडिंग केले जाणार आहे. ‘जाक्सा’ने ’एक्स’वरील स्लिमच्या अकौंटवर हे छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र पृथ्वीपासून एक लाख किलोमीटर अंतरावरून टिपण्यात आले आहे.

या लँडरचा कॅमेरा अशा प्रकारे डिझाईन केला आहे. जेणेकरून तो चंद्रावरील विविध विवरांची ओळख करू शकेल. त्यामध्ये नेव्हिगेशन सिस्टीमही बसवण्यात आली आहे. स्लिमला ‘चंद्राचा स्नायपर’ असेही म्हटले जाते. स्लिमने 26 सप्टेंबरला दुसर्‍यांदा आपली कक्षा बदलली आहे. त्याचे लँडर चांद्रभूमीवर कधी उतरणार याची तारीख जपानने अद्याप जाहीर केलेली नाही.

Back to top button