‘आजी-आजोबा’ दिवस! राज्यभरात रविवारी विविध उपक्रम घेण्याचे निर्देश | पुढारी

‘आजी-आजोबा’ दिवस! राज्यभरात रविवारी विविध उपक्रम घेण्याचे निर्देश

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे. त्यामुळे यावर्षी 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी आजी-आजोबा दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणार्‍या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी 10 सप्टेंबर रोजी आजी आजोबा दिवस असून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आजी आजोबा दिवस हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणार्‍या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. नगर जिल्ह्यातही रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

आजी-आजोबा देणार धडे

रविवारी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांना शाळेत आणावे, तेथे त्यांचा सर्व विद्यार्थ्यांना-शिक्षकांना परिचय करून द्यावा. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळही असावेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा हे शाळेत येतील, शाळेतील विद्यार्थीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर करणार आहेत. आजी-आजोबांनी आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे, तसेच झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व देखील यावेळी विद्यार्थ्यांना सांगावे.

हेही वाचा

आदिवासी तरुण झाला अधिकारी! कडाळेची अधिकारीपदी झेप

कर्जत : सीना नदी सीना पात्रात बेकायदा वाळू उपसा

पिकांसह माणसं, जनावरांची काहिली..! दुष्काळाच्या झळांनी अवघे चराचर हतबल..!

Back to top button