कर्जत : सीना नदी सीना पात्रात बेकायदा वाळू उपसा | पुढारी

कर्जत : सीना नदी सीना पात्रात बेकायदा वाळू उपसा

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : उच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही तालुक्यातील घुमरी गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात वाळू माफियांकडून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. या अवैध वाळू उपशाला महसूल विभाग, पोलिसांचे पाठबळ आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात कर्जत येथील उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, जिल्हा गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकारी यांना तसे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर अ‍ॅड.शिवाजीराव अनभुले, पोपट अनभुले, दादासाहेब अनभुले, नामदेव अनभुले, संजय अनभुले, काशिनाथ अनभुले, भाऊसाहेब अनभुले, अनिल अनभुले यांच्यासह सुमारे 39 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. वाळू माफियांवर 30 सप्टेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास घुमरी येथील सर्व ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यावेळी ग्रामस्थांनी सांगितले, घुमरी गावाच्या शिवारात सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तसेच, ग्रामसभेने ठराव केलेला असून, याबाबतची सर्व माहिती महसूल व पोलिस प्रशासनाला ग्रामस्थांनी वेळोवेळी दिलेली आहे. असे असताना नदी पात्रामधून दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उपसा माफीया करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पोलिस व महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

वाळू माफियांची मुजोरी

अवैध वाळू उपशाची तक्रार करणार्‍या ग्रामस्थांना वाळूमाफिया जिवे मारण्याची धमकी देत आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील पाईपलाईन त्यांनी फोडली आहे. वाळू वाहणार्‍या टिप्पर व डंपरमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. वाळू माफियांच्या मुजोरपणाला शेतकरी व ग्रामस्थ कंटाळले आहेत.

हेही वाचा

अहमदनगर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलवर मिटकेंचा छापा, एकजण ताब्यात

पाऊस नसल्याने आता विहिरी खोदण्याची कामे सुरू

आदिवासी तरुण झाला अधिकारी! कडाळेची अधिकारीपदी झेप

Back to top button