कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको | पुढारी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको

एकरुखे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरल्याने त्यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको केला. गेल्या पाच-सहा दिवसापासून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बर्‍यापैकी भाव मिळत होता. परंतु
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्यास सुरुवात केली. या विषयाची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम कांदा भावावर झाल्याने राहाता बाजार समितीत जमा झालेले शेतकरी नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनासाठी उतरले होते.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2400 ते 2500 रुपये दरम्यान भाव जात असताना काल रविवारी 1800 ते 2000 च्या आत प्रतिक्विंटल कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

सचिव उद्धव देवकर यांनी शेतकर्‍यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी भावावर ठाम असल्याने संतप्त शेतकरी थेट नगर- मनमाड हायवे वरती ठिय्या आंदोलनाला बसले. त्यामुळे महामार्गावर शिर्डी व राहत्याच्या दिशेने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी केली.

फेर लिलाव करावा

मागील भावाच्या तुलनेत आता सरासरी 500 ते 700 रुपये भाव कोसळले आहे. काल रविवारी सकाळी काही प्रमाणात लिलाव झाला होता आता फेर लिलाव करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केलेली आहे. अश्वास मिळाल्याने एक वाजेच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन पावणे तीन वाजेच्या दरम्यान मागे घेण्यात आले.

हेही वाचा

केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

भंगारातून निर्मिली सहाचाकी गाडी!

Back to top button