भंगारातून निर्मिली सहाचाकी गाडी! | पुढारी

भंगारातून निर्मिली सहाचाकी गाडी!

बीजिंग : सोशल मीडियावर केव्हा, काय व्हायरल होईल, हे अजिबात सांगता येत नाही. एखाद वेळेस कोणी कारला हेलिकॉप्टरचे रूपडे देते तर कोणी विटेपासून चक्क कूलर तयार करतो. असाच एक जुगाड व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यात एक व्यक्ती चक्क आपल्या गॅरेजमधील भंगारातून सहाचाकी गाडी करण्यात यशस्वी झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती छोट्याशा गाडीवर बसल्याचे दिसून येते आहे. आता ही गाडी प्रथमदर्शनी लहान मुलांच्या खेळण्यासारखे भासेल. पण, व्यवस्थित पाहिल्यानंतर कळते की, हे खेळणे नसून ती सहाचाकी गाडी आहे. ही गाडी एखाद्या घोडेगाडीसारखीही आहे. चार पायासारखे दिसणारे चार रॉड समोरील बाजूने दिसतात आणि मधोमध दोन टायरही फिट करण्यात आले आहेत. याशिवाय, बसण्यासाठी सीटही बसवली गेली आहे.

तन्सूयेगेन या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ टि्वट करण्यात आला असून एका चिनी इंजिनिअरने ही कमाल केली असल्याचा यात दावा केला गेला आहे. हा व्हिडीओ पहिल्या काही मिनिटातच 57 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. काही लोकांनी या जुगाड वाहनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली तर काहींनी त्याच्या वेग मर्यादेवर शंका व्यक्त केली. या गाडीला 5 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किमान 50 मिनिटे लागतील, असे एका युजरने नमूद केले.

Back to top button