नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात | पुढारी

नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात येतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील शेतकरी सद्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात फक्त रिमझिम पाऊस होत आहे. दमदार पावसाचा पत्ता नाही. किरकोळ पावसावर आलेल्या पिकांची ढगाळ वातावरणामुळे वाढच खुंटली आहे. तण मात्र झपाट्याने वाढत आहे. कपाशी, तूर अन्य पिकांची खुरपणी करता-करताच शेतकर्‍यांची नाकीनऊ आले आहेत. रोजंदारीवर मजूर मिळत नसल्याने घरातील लहान-मोठ्यांची हजेरी शेतात दिसत आहे.

प्रारंभी तालुक्यात कमी-अधिक फरकाने पाऊस झाल्याने या पावसावरच शेतकर्‍यांनी मका, तूर, कपाशी पिके घेतली आहेत. पावसाच्या भरवशावरच पिके घेतली असताना आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.. शासनाकडून येणार्‍या मदतीचा खेळखंडोबा झाला आहे. नुसत्या मदतीच्या याद्या मोबाईलवर फिरत आहेत. केवायसीचे भूत सर्वांना सतावत आहे. नेमकी कोणती यादी कोणत्या मदतीची आहे. हेच कोणाला समजत नाही व सांगताही येत नाही.

शेतकर्‍यांनी उधारउसनवारी करून खरीप पिके घेतली आहेत. पिकांमध्ये कोळपणी, पाळी घालण्याचे काम सध्या होताना दिसत आहे. रासायनिक खतांचा डोसही कपाशीसह अन्य पिकांना दिला जात आहे. फवारणी केली जात आहे. तालुक्यात रिमझिम पाऊस अधूनमधून येत आहे. तोही आता अधूनमधून येत असल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. वडाळा बहिरोबा, घोडेगाव, सोनई, करजगाव, पानेगाव, भालगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, नेवासा परिसर, सलाबतपूर, शिरसगाव, मुकिंदपूर, गोंडेगांव, भेंडा आदी भागात पाणी असणार्‍या शेतकर्‍यांनी पावसाअगोदर खरिपाची पेरणी, कपाशी लागवडी केल्या आहेत. थोड्या फार प्रमाणात ही पिके वाढली आहेत. पंरतू आता पावसाची गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यात कपाशी, तूर, मका, बाजरी, ज्वारी आदी पिके प्रारंभी तजेदार वाटणारी ही पिके आता पाण्याअभावी कोमजली जात आहे.
तालुक्यात पावसाची नितांत गरज आहे.पावसाचे केवळ वातावरणात होते. पंरतू पाऊस येत नसल्याने चिंतेचे ढग जमा होऊ लागले आहेत. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

हेही वाचा :

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Haryana Nuh Violence | नूहमधील बुलडोझर कारवाई हायकोर्टाच्या आदेशानंतर थांबवली

Back to top button