नांदूरमधमेश्वरात फुलली कमळे ! देशी-विदेशी पक्षांचे आगमन | पुढारी

नांदूरमधमेश्वरात फुलली कमळे ! देशी-विदेशी पक्षांचे आगमन

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा टायफा आणि पाणवेली काढल्याने नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचे विशेष आकर्षण असलेली कमळाची फुले मोठ्या प्रमाणावर फुललेली आहे. पर्यटकांना की आकर्षक करीत आहेत. तसेच विदेशी पक्षांचेही आगमन झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील हे निसर्गाचं देणं पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दरवर्षी चापडगाव पासून दोन किलोमीटर अंतरावरील एक हेक्टर क्षेत्रात कमळाची फुले मोठ्या प्रमाणावर फुलत असतात. एकाच वेळी कमळाची हजारो फुले बघण्याचा नैसर्गिक आनंद वेगळाच असतो. येथे गत वर्षी ‘पानवेली’ व ‘टायफा’ गवताच्या वाढीने कमळाची फुले फुलले नाही.

वनविभागाने उन्हाळ्यात हे गवत काढल्याने कमळ फुले चांगल्या रितीने फुलली आहे. पर्यटकांना नांदूर मधमेश्वरचा हा परिसर पाहण्याची तयारी ठेवल्यास चांगले वर्षा पर्यटन होवू शकते. त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच खाद्य खाण्यासाठी देश विदेश मधून स्थलांतरित पक्षांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याने अभयारण्यातील क्षेत्रात पक्षांचा किलबिलाट वाढला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अभयारण्यात दर्शन न दिलेल्या फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. परंतु त्याने किलबिलाटापासून दूर राहणे पसंद केले आहे. शिवाय हिवाळ्यामध्ये सायबेरियामधून येणार्‍या थापट्याचे दर्शन होऊ लागले. दुर्मिळ ब्लॅक बीटर्न हा पक्षी दिसत आहे. राखी बगळा, रंगीत करकोचा यांनी या वर्षी वृक्षांवर वीण केल्याने त्यांची पिल्ले दिसताहेत. अभयारण्यात सध्या दाखल झालेल्या काळ्या डोळ्यांचा मुनिया, सुगरण, बंड्या, राखी बगळ्याचे दर्शन स्थानिकांना होत आहे.

कमळ पक्षी, जांभळ्या पाणकोंबड्याची संख्या वाढली आहे. सुगरणीची वीण सुरू असल्याने त्या घरटी तयार करण्यात मग्न आहेत. तीन प्रकारचे किंगफिशर दिसत आहेत. टिटवी, तितर, तीन उतप्रकारच्या मुनिया, अभयारण्यात सध्या आहेत. एकंदरीत परिसर नैसर्गिकरित्या हल्ला पक्षाच्या किलबिलाटाने मंत्रमुग्ध झाला आहे. महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ नांदूर मधमेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकहून एक-सव्वा तास, सिन्नरहून पाऊण तास, तर निफाडहून वीस मिनिटे लागतात.

नांदूर मधमेश्वर अभयारण्य निफाड तालुक्यात (जि. नाशिक) आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. अभयारण्याचे क्षेत्र सुमारे 100.12 चौरस किलोमीटर एवढे आहे. गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर 1999मध्ये बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे, अशी भूरूपे तयार झाली.

पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे 35 हजार पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली यांनी सन 1982 मध्ये नांदूर मधमेश्वरला भेट दिली आणि ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे’ असे उद्गार काढले आणि सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली.

हा परिसर 1986 मध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला. मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंड्या, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात.  या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते. तसेच येथे टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात.

त्याशिवाय गॉडविट, सँड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात. पक्षीनिरीक्षकांच्या नोंदीनुसार येथे सुमारे 240 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात.अभयारण्य परिसरात कोल्हा, मुंगूस, उदमांजर, बिबटे, लांडगे, विविध प्रकारचे साप इत्यादी प्राणी आढळतात. येथील जलाशयात सुमारे 24 जातींचे मासे आहेत. पक्षनिरीक्षकांसाठी चापडगाव येथे दुर्बिण, स्पॉटिंग स्कोप, फिल्ड गाईड (पक्षी मार्गदर्शक पुस्तक), मार्गदर्शक यांची सोय करण्यात आलेली आहे. जलाशयाच्या काठाने निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत.मांजरगाव येथेसुद्धा निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेला आहे. खाणगाव थडी येथे निसर्ग निर्वाचन केंद्र, वन उद्यान, वनविश्रामगृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

Back to top button